बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, केरळ ही ठिकाणे मधुचंद्रासाठी अथवा निवांत फिरण्यासाठी ओळखली जातात. (असा तुम्हा आम्हा सामान्यांचा समज आहे.) परंतु या ठिकाणच्या नागरी सोयी अतिशय उच्च दर्जाच्या आहेत. तेथे अत्यंत शुद्ध पाणीपुरवठा २४ तास होतो, आखीवरेखीव आणि लांबरुंद रस्ते तेथे आहेत, अनधिकृत बांधकामे तेथे नावालाही नाहीत, सुंदर बागा, प्रशस्त मैदाने या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालत आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आपल्या नगरसेवक/सेविकेला जाऊन भेटा. तेथील या साऱ्या सोयी आपल्या मतदारांना कशा पुरवता येतील या विवंचनेत सध्या ते मग्न आहेत. तेथील नागरी सुखसोयींचा नीट अभ्यास करून त्या मुंबईतही कशा पुरवता येतील या विचारात ते बुडालेले आहेत. ही सारी शहरे मुंबईच्या पासंगालाही पुरणार नाहीत, मुंबईच्या तुलनेत या ठिकाणची लोकसंख्या अगदी किरकोळ आहे, तेथील आणि मुंबईतील सगळीच परिस्थिती अगदी टोकाची वेगळी आहे, अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींकडे लक्ष न देता मतदारांच्या भल्यासाठी तब्बल १४४ नगरसेवक/सेविका ऐन थंडीचीही पर्वा न करता या ठिकाणांकडे कूच करण्याच्या तयारीला लागले आहेत. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांना नाइलाजाने विमानाने जावे लागणार आहे. तर ‘अभ्यास’ नीट करण्यासाठी आलिशान हॉटेलांमध्येही त्यांना राहणे ‘भाग’ पडणार आहे.
चार विशेष समित्यांच्या नगरसेवक-नगरसेविकांनी अभ्यास दौऱ्याच्या नावाने बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, केरळ आणि गुजरातला जाण्याचे बेत आखले आहेत. आजपर्यंत विविध समित्यांच्या अभ्यास दौऱ्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. या दौऱ्यांवर आता थोडेथोडके नव्हे, तब्बल ४० लाख खर्च होणार आहेत.
स्थापत्य समिती (शहर), स्थापत्य समिती (उपनगरे) महिला व बाल कल्याण समिती आणि बाजार उद्यान समितीवरील १४४ सदस्य नगरसेवक-नगरसेविकांना अभ्यास दौऱ्याचे वेध लागले आहेत. या दौऱ्यांच्या तारखा काही जुळत नव्हत्या. बराच काथ्याकूट केल्यानंतर स्थापत्य समिती (शहर)चा दौरा १५ ते १९ डिसेंबरदरम्यान, तर महिला व बाल कल्याण समितीचा दौरा १५ ते १८ डिसेंबरदरम्यान मुक्रर करण्यात आला आहे. त्यामुळे या समित्यांमधील ७२ नगरसेवक-नगरसेविकांचे चेहरे खुलले आहेत.
विमानाने जाणे-येणे, पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य आणि फिरण्यासाठी शानदार गाडीही त्यांना मिळणार आहे. एका समितीच्या दौऱ्यासाठी साधारण १० लाख रुपये याप्रमाणे चार समित्यांच्या दौऱ्यासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्ची पडणार आहेत.
बाजार आणि उद्यान, तसेच स्थापत्य समिती (उपनगरे)च्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दौऱ्यावर येण्यास इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या तारखा जुळत नसल्यामुळे स्थापत्य समिती (उपनगरे)चा दौरा जानेवारीपर्यंत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. तर बाजार उद्यान समितीचा केरळ दौरा २५ डिसेंबर रोजी निघण्याची शक्यता आहे. प्रत्येक समिती सदस्यांच्या दिमतीसाठी चिटणीस विभागातील तीन कर्मचाऱ्यांनाही या सहलीचा लाभ घडणार आहे.