मुंबईमध्ये हळूहळू लेप्टोस्पायरोसिसच्या साथीचा प्रादुर्भाव वाढत असून बळी आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. असे असताना पालिका सभागृहात मात्र लेप्टोच्या नावाखाली राजकारण शिगेला पोहोचले. नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या, तर काही नगरसेवकांनी उंदराचा पिंजरा सभागृहात नाचवत प्रशासनाला भेट दिला. मनसेने लोकसंख्या नियंत्रण आणि परप्रांतीयांच्या लोंढय़ावर केलेल्या टीकेला शिवसेनेने पाठिंबा देत राजकारण तापवले.  या चर्चेदरम्यान लेप्टो रोखण्यासाठी कोणती उपाययोजना करायला हवी याबाबत एकाही नगरसेवकाने सूचना केली नाही.
जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वस्त्या जलमय झाल्या आणि आता लेप्टो, स्वाईन फ्लूसारखे साथीचे आजार बळावू लागले आहेत. मात्र प्रशासन कोणत्याच उपाययोजना करीत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सोमवारी सभागृहात केला आणि गोंधळाला सुरुवात झाली. लेप्टो कशामुळे होतो, किती जणांना झाला, किती जण दगावले, कोणत्या विभागात लेप्टोचा जोर आहे याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख देत असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत फलक झळकावत उंदराचे पिंजरे प्रशासनाला भेट दिले. हा गोंधळ शांत झाल्यानंतर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी तीन मजली झोपडय़ा, लोकसंख्या नियंत्रण आणि परप्रांतीयांच्या लोंढय़ांमुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याचा मुद्दा उपस्थित करताच समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यामुळे मनसे आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेकांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. तर परप्रांतीयांची पाठराखण करणाऱ्यांना खिजविण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी देशपांडे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आगीत तेल ओतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा