लॅपटॉप, भ्रमणध्वनी पदरात पाडून घेतल्यानंतर आता मानधनात वाढ व्हावी आणि मुंबईबाहेर ये-जा करताना भरावा लागणारा टोलही माफ करावा अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांचे प्रश्न झटपट सोडविता यावेत आणि सभागृह- समित्यांच्या कार्यक्रम पत्रिकांच्या गठ्ठय़ांना सुट्टी मिळावी, या हेतूने माहिती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करीत प्रशासनाने नगरसेवकांना लॅपटॉप, अ‍ॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीही दिले. मात्र मोजकेच नगरसेवक लॅपटॉपचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. बहुतांश नगरसेवकांना भ्रमणध्वनीवर खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते संगणक प्रणालीवर पाठविताही आले नाही.
नगरसेवकांना दर महिन्याला १० हजार रुपये मानधन मिळते. ते २५ हजार रुपये करावे, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. आता नगरसेवकांना टोलही भरायचा नाही. बाहेरगावी जाताना वाशी आणि पनवेल येथे मुंबईतील नगरसेवकांना टोल भरावा लागतो. मात्र नवी मुंबईतील नगरसेवकांना वाशी येथे टोल न भरताच मुंबईस जाण्याची मुभा दिली आहे. तसेच वडाळा पोर्ट टोलनाक्यावरही ही सवलत नवी मुंबईतील नगरसेवकांना देण्यात आली आहे. आता या सवलती मुंबईतील नगरसेवकांनाही हव्या झाल्या आहेत.
नगरसेविका उषा कांबळे यांनी टोल सवलतीची मागणी केली असून या विषयावर पालिका सभागृहात चर्चा होणार आहे. ही सवलत पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे नगरसेवक आग्रही भूमिका घेतील, असेच एकंदर चित्र आहे.