रस्ते, पदपथांवरील अडथळा दूर करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न; मूर्तिकार, मंडप उभारणी करणाऱ्यांमध्ये असंतोष
गेल्या वर्षी परवानगी देण्यात आलेले, मात्र रस्ता अथवा पदपथावर अडथळा बनणाऱ्या गणेश कार्यशाळांच्या मंडपांचे आकारमान कमी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र या आदेशामुळे मूर्तिकार आणि गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी मंडप उभारणी करणाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
गणेशोत्सव जवळ येताच मुंबईमधील पारंपरिक मूर्तिकार मैदाने, रस्ते, पदपथ, मोकळे भूखंड आदी ठिकाणी पालिकेकडून परवानगी घेऊन मंडप उभारतात आणि तेथे गणेश कार्यशाळांचा श्रीगणेशा केला जातो. या गणेश कार्यशाळांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात येतात. भाविक गणेशोत्सवाच्या काही दिवसांपूर्वीच या कार्यशाळांमधून मोठय़ा मूर्ती उत्सवस्थळी वाजतगाजत घेऊन जातात. गणेशोत्सवापूर्वी भाविक गणेशमूर्तीची नोंदणी आधीच करीत असल्याने त्यांच्या पसंतीसाठी पेण येथील तयार गणेशमूर्ती मुंबईत पदपथावर उभारलेल्या मंडपांमध्ये प्रदर्शित केल्या जातात. पसंतीच्या मूर्तीची नोंद झाली की त्या गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविक आपल्या घरी घेऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते आणि पदपथावर या गणेश कार्यशाळांसाठी मूर्तिकार मोठमोठे मंडप पालिका, वाहतूक पोलीस आदींची परवानगीने उभारत आहेत. परंतु कालांतराने रस्ते आणि पदपथावर अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांबाबत न्यायालयाने कडक भूमिका घेतल्यामुळे पालिकेने आपल्या नियमांमध्ये फेरबदल केले. हे बदल करताना मूर्तिकार आणि भाविकांचा रोष ओढावला जाऊ नये, यासाठीही पालिका प्रशासनाने विशेष काळजी घेतली. त्यानुसार पालिकेने पादचारी, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशा पद्धतीने रस्ते, पदपथावर मूर्तिकारांना मंडप उभारण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षीपर्यंत काही मोठे मूर्तिकार पालिकेच्या परवानगीने नियमानुसार रस्त्यात मोठमोठे मंडप उभारत होते. परंतु काही ठिकाणचे मंडप पादचारी आणि वाहतुकीला अडथळा बनले. त्यामुळे मूर्तिकारांच्या मंडपांचे आकारमान यंदा कमी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसे आदेश पालिकेचे उपायुक्त आणि २४ विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मुंबईत सुमारे एक लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती, तर १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबईत गणेशमूर्ती साकारण्यात येतात. यापैकी काही गणेशमूर्ती पेण येथून मुंबईत आणून विकण्यात येतात. मंडपाचे आकारमान कमी करण्यात आले तर मूर्ती ठेवायच्या कुठे, असा प्रश्न मुंबईसह पेणहून मूर्ती आणणाऱ्यांना पडला आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार मात्र अडचणीत आले आहेत. त्यांनी या निर्णयाबाबत असंतोष निर्माण केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा