मुंबई : मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दोन वर्षांमध्ये विविध भागांमध्ये २५० ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आले आहेत. आता २०२५ मध्ये आणखी २५ ‘आपला दवाखाना’ आणि तीन फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे या वर्षांमध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या’ची संख्या २७५ वर पोहचेल आणि अधिकाधिका नागरिकांना याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईकरांना सहज आरोग्य सेवा मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने यामध्ये वाढ करण्यात आली. गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने ३३ पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टीक सेंटरचा समोवश असलेल्या २५० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आले. या आपला दवाखान्यामध्ये नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, रक्त चाचण्या या सेवा पुरविण्यात येतात. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केल्यापासून डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ९० लाख रुग्णांनी या विविध सेवांचा लाभ घेतला. पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कान-नाक-घसा चिकित्सक, दंतचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, वैद्यकीय चिकित्सक, त्वचारोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या सेवा पुरविण्यात येत आहेत. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतर दवाखान्यांमध्ये खाजगी डायग्नोस्टिक सेंटरमार्फत एक्स-रे, मॅमोग्राफी, ईसीजी, सिटी स्कॅन, एमआरआय या सेवा व्हॉऊचर पध्दतीने अनुदानित दराने पुरविण्यात येत आहेत. याचबरोबर, आरे कॉलनी आणि गोवंडी, मानखुर्द विभागातील दुर्गम भागांमध्ये फिरत्या दवाखान्यांमार्फत आरोग्य सेवा देण्यात येत आहेत.
नागरिकांच्या सोयीच्या वेळेत आणि घराजवळ दवाखाने उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने मुंबईतील नागरिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेत आहेत. दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधांमध्ये पडणारी भर पाहता या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’ना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तो वाढत आहे. ही बाब लक्षात घेता २०२५ मध्ये आणखी २५ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने’ आणि तीन फिजिओथेरपी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. २५ नवे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.