प्रायोजक पुढे येईनात; कंत्राटदारांनी पाठ फिरविल्याने पालिकेचा निर्णय
प्रसाद रावकर, मुंबई</strong>
इंधन बचतीचा मंत्र जपला जावा आणि सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर सायकल सफरीचा आनंद लुटता यावा या उद्देशाने पालिकेने गवगवा करीत नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यान सायकल मार्गिका सुरू केली. मात्र अल्पावधीतच प्रायोजकांनी पाठ फिरविली, तर पालिकेच्या आवाहनाला अन्य प्रायोजकांनी प्रतिसादच दिला नाही. पालिकेने कंत्राटदारांनाही साद घातली. पण कुणीच पुढे न आल्यामुळे अखेर ही सायकल सफर काळाच्या पडद्याआड गेली आहे.
नागरिकांना सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी पालिकेने सुट्टीच्या दिवशी नरिमन पॉइंट ते वरळी दरम्यान ११.२ कि.मी. लांबीची सायकल मार्गिका उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी सकाळी ६ ते ११ या वेळेत देश-विदेशातील पर्यटकांना, तसेच मुंबईकरांना सायकल सफरीचा आनंद लुटण्याची संधी या मार्गिकेमुळे उपलब्ध करण्यावर शिक्कामोर्तब झाले. पहिल्या टप्प्यात नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी दरम्यानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर सायकल मार्गिका सुरू करण्यात आली. ‘हॅण्डल बार’ या संस्थेने प्रायोजकत्व स्वीकारले आणि ३ डिसेंबर २०१७ पासून या सायकल मार्गिकेचे लोकार्पण झाले. मात्र, संस्थेला ही मार्गिका चालविण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत संपुष्टात आली आणि ही मार्गिका बंद पडली.
सायकल मार्गिका उपक्रम राबविण्यासाठी पालिकेने १८ एप्रिल रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन प्रायोजकत्व स्वीकारण्यासाठी संस्थांना आवाहन केले. मात्र केवळ ‘रेडिओ मिर्ची’ या एकमेव संस्थेने पालिकेला अर्ज सादर केला. अखेर सायकल मार्गिकेचे प्रायोजकत्व ‘रेडिओ मिर्ची’ला देण्यात आले. मात्र जाहिरात करण्याची परवानगी मिळावी असा आग्रह ‘रेडिओ मिर्ची’कडून पालिकेकडे धरण्यात आला होता. मात्र जाहिरातीचे हक्क देण्याबाबत मर्यादा असल्याने पालिकेसमोर यक्षप्रश्न निर्माण झाला. अखेर पालिकेने ही मार्गिका स्वत:च चालविण्याचा निर्णय घेतला आणि कंत्राटदारांना साद घातली. या सायकल मार्गिकेचा एका दिवसाचा खर्च तीन लाख रुपये असून पालिकेने साद घातल्यानंतर एकही कंत्राटदार पुढे आला नाही. प्रायोजक आणि कंत्राटदारांनीही पाठ फिरविल्यामुळे अखेर नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी दरम्यान सुट्टीच्या दिवशी नागरिकांना घडणारी सायकल सफर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा उपक्रम चालविण्यासाठी प्रायोजक आणि कंत्राटदारांना आवाहन करण्यात आले होते. मात्र कुणीच पुढे आले नाही. तसेच सायकल मार्गिका चालविणाऱ्या संस्थेला जाहिरातीचे हक्क देणे पालिकेला शक्य नाही. परिणामी, मुंबईकरांना व्यायाम घडविणरा आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर सायकल सफरीचा आनंद देणारा हा उपक्रम बंद पडला.
– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त ‘ए’ विभाग कार्यालय