नरिमन पॉइंट-सीएसटी रस्त्याच्या रुंदीकरण प्रस्तावात मूळ हेतूच बाजूला;
अडथळे दूर करण्याऐवजी अर्धवट रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय
हजारो प्रवाशांची दैनंदिन वर्दळ असलेल्या नरिमन पॉइंट परिसर ते छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेला जाणाऱ्या हजारीमल सोमाणी मार्गावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र या संपूर्ण रुंदीकरणात बॉम्बे जिमखान्यासह अन्य काही बांधकामे अडथळा ठरत असल्याने ती हटवण्याऐवजी अर्धवट रस्त्याचे रुंदीकरण करण्याचेच पालिकेने ठरवले आहे. त्यामुळे हे अर्धवट रुंदीकरण झाल्यानंतरही नरिमन पॉइंट ते सीएसटी दरम्यानच्या वाहतूक कोंडीला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
तत्कालीन अतिरिक्त आयुरक्तांनी बॉम्बे जिमखान्यावर मेहेरनजर करीत हजारीमल सोमाणी मार्गावरील निम्म्यापेक्षा कमी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्याची तयारी रस्ते विभागाने सुरू केली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दोन भागांत दोन कंत्राटदारांना देणार की एकाच कंत्राटदाराकडून या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण करून घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नरिमन पॉइंट परिसरातून जे. जे. पूलमार्गे भायखळा आणि त्यापुढे जाणाऱ्या वाहनांची फॅशन स्ट्रीटजवळच्या हजारीमल सोमाणी मार्गावर कोंडी होत होती. रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावर कायम वाहनांची रांग लागलेली असायची. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा विचार रस्ते विभाग करीत होता. सध्या सुमारे ५० फूट रस्ता ८० फूट करण्याची योजना तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी आखली होती. या रुंदीकरणामध्ये बॉम्बे जिमखाना आणि आझाद मैदानाच्या काही भागासह अन्य काही वास्तू येत होत्या. बॉम्बे जिमखाना टाळून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि निम्म्याहून कमी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावानुसार ६८५ मीटरपैकी केवळ २१० मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम एका कंत्राटदाराला देण्यावरही प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे.
याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार हजारीमल सोमाणी मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले तर वाहतुकीला गती मिळण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जाणार आहे. या प्रस्तावानुसार फॅशन स्ट्रीटच्या दिशेने सुरू होणारा रस्ता ५० फूट राहील आणि पुढे तो ८० फूट रुंद होईल. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणे अवघडच आहे.
संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण करणार?
संपूर्ण हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाच्या आड फॅशन स्ट्रीट येथील बॉम्बे जिमखान्यापासून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील कॅननपर्यंतची बांधकामे येत आहेत. ही बांधकामे रुंदीकरणात तोडावी लागणार आहेत. पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने अलीकडेच या रस्त्याचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉम्बे जिमख्याना, आझाद मैदान आणि सध्या अस्तित्वात असलेल्या बांधकामांची ३० फूट जागा रस्त्यात जाणार आहे. आझाद मैदान हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रस्त्यासाठी लागणारी ३० फूट जागा मिळविण्याचे प्रयत्न पालिका करणार आहे. जिल्हाधिकारी वा सरकारी यंत्रणांच्या अखत्यारितील जागा रस्त्यासाठी आवश्यक असल्यास ती १ रुपया प्रतिचौरस मीटर दराने पालिकेला द्यावी लागते. या नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ३० फूट जागा पालिकेला मिळविता येईल. मात्र बॉम्बे जिमखाना व अन्य बांधकामे असलेल्या संस्थांची व्यवस्थापने कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी जिमखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधीला प्रवेश नाकारला.