भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार) अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी उद्या, २७ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व महापालिका, सरकारी आणि खासगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसात शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज (२६ जुलै) मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर रायगड जिल्ह्याला उद्याही ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
खरं तर, सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकत आहे. परिणामी पुढील दोन दिवस राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसराला रेड अलर्ट दिला आहे.