वांद्रे-पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ तानसा जलवाहिनीवरच उभारण्यात आलेल्या तब्बल ४८ झोपडय़ा आणि १२ स्टॉल्स पालिकेच्या एच-पूर्व विभाग कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने झोपडपट्टीवासीयांचा विरोध झुगारून गुरुवारी जमीनदोस्त केल्या. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
जलवाहिन्यांवर अथवा लगत उभारण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. या आदेशानुसार वांद्रे-पूर्व येथे रेल्वे स्थानकाबाहेर पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी स्कायवॉक उभारण्यात आला असून गेल्या काही वर्षांपूर्वी या स्कायवॉकखाली ४८ झोपडय़ा आणि १२ स्टॉल्स उभारण्यात आले होते. पालिका अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर या झोपडय़ा आणि स्टॉल अपात्र असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एच-पूर्व विभाग कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाने या झोपडय़ा आणि स्टॉल्स गुरुवारी तोडून टाकल्या, अशी माहिती एच-पूर्व विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विरोधी पथक आणि जल विभागातील अधिकारी स्कायवॉकजवळ पोहोचताच झोपडपट्टीवासीयांकडून तीव्र विरोध करण्यात आला. मात्र वेळीच वाढीव पोलीस बंदोबस्त मिळाल्याने ही कारवाई सुरळीत पार पडली. पालिकेचे १० अधिकारी, ५० कामगार यांनी एक जेसीबी आणि दोन डम्परच्या साह्य़ाने ही कारवाई पार पाडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा