संस्थांची निवड होऊन वर्ष उलटल्यानंतरही करार नाहीच

सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर मुंबईमध्ये १२ ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याची पालिकेची योजना संस्थांची निवड प्रक्रिया संपून वर्ष झाली तरी अद्याप कागदावरच आहे. यातील निवड झालेल्या दोन संस्थांनी माघार घेतल्यामुळे १२ पैकी पाच केंद्रांचा प्रस्ताव बारगळला आहे. त्यामुळे या पाच केंद्रासाठी पुन्हा नव्याने निविदा काढण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे.

मुंबईत नवी १२ डायलिसिस केंद्रे सुरू होणार असून १९९ डायलिसिस यंत्रे मुंबईत उपलब्ध होणार असल्याचे पालिकेने जुलै २०१६ मध्ये जाहीर करत यासाठी खासगी संस्थांची निवड करण्यासाठी निविदादेखील काढल्या. या निविदांमध्ये ३५० रुपयांपेक्षा कमी शुल्क देणाऱ्या संस्थां पात्र असतील असेही सांगण्यात आले. त्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार संस्थांची १२ केंद्रांसाठी निवड केली गेली. यामध्ये मानव संस्था (१ केंद्र), रहबर फाऊंडेशन (४ केंद्रे), बीईंग ह्य़ूमन द सलमान खान (१ केंद्र)आणि एकसॅग संजीवनी (४ केंद्रे) या संस्थांची निवड करण्यात आली होती. मात्र या निवड प्रक्रियेलाही वर्ष उलटले तरी अद्याप एकाही संस्थेसोबत करार झालेला नाही. बीईंग ह्य़ूमन या संस्थेला आणि एकसॅग संजीवनी या संस्थाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने वर्षभरानंतर आता फेब्रुवारीत या दोन्ही संस्थांना कारणे दाखवा नोटीस पाठविलेली आहे. मात्र या दोन्ही संस्थांनी केंद्र सुरू करण्याच्या कामास नकार दिल्याने आता ज्या केंद्रांसाठी निवड झाली होती, अशी पाच केंद्रे बारगळली आहेत. त्यामुळे आता या पाच केंद्रांसाठी नव्याने निविदा काढण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे. १२ केंद्रापैकी पाच केंद्राचे काम रखडले असले तरी उर्वरित केंद्रांचे काम सुरू आहे. लवकरच ही केंद्रे सुरू होतील, असे सीईओ पद्मजा केसकर म्हणाल्या.

आणखी तीन केंद्रे

सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर डायलिसिस केंद्र सुरू करण्याच्या योजनेचा बोजवारा उडालेला असताना पालिकेने अजून तीन ठिकाणी डायलिसिस केंद्रे सुरू करण्याचा घाट घातला आहे. ही नवी तीन केंद्रे आणि आधीच्या बारामधील बारगळलेली पाच अशा एकूण आठ केंद्रांसाठी आता नव्याने पालिका निविदा काढणार आहे.

Story img Loader