मुंबई : मुंबईतून आजपासून क्लीन अप मार्शलची सेवा पूर्णतः बंद होणार आहे. गेल्यावर्षी सुरू केलेले कंत्राट संपले असून ४ एप्रिलपासून मुंबईच्या रस्त्यावर क्लीन अप मार्शल दिसणार नाहीत. मात्र त्यानंतरही क्लीन अप मार्शल रस्त्यावर दिसले किंवा त्यांनी मुंबईकरांना दंड लावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मदत क्रमांक जाहीर केला आहे.

मुंबई महापालिकेने एप्रिल २०२४ मध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात ३० याप्रमाणे संपूर्ण मुंबईत मार्शल नेमले होते. रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, रस्त्यावर स्नान करणे, मलमूत्र विसर्जन करणे अशा प्रत्येक चुकांसाठी हे क्लीन अप मार्शल नागरिकांकडून २०० रुपये ते एक हजार रुपये दंड वसूल करीत होते. मात्र क्लीन अप मार्शलची सेवा आता बंद करण्यात आली आहे. क्लीन अप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनामुळे हा निर्णय घेतला आहे.

‘क्लीन अप मार्शल’ कडून ४ एप्रिल २०२५ नंतर दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाची नवीन नियमावली तयार होत असून ती नियमावली तयार झाल्यानंतर विविध प्रकारच्या दंडाच्या रकमेतही बदल होणार आहेत. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

क्लीन अप मार्शलवर यापूर्वी कारवाई

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने क्लीन अप मार्शल सेवा पुरवठादार संस्थांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. पालिकेच्या सहा रुग्णालयांमधील क्लीन अप मार्शलची सेवा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात क्लीन अप मार्शल संस्थाना मुंबई महापालिका प्रशासनाने दंड लावला होता.

क्लीन अप मार्शलनी कामात कुचराई केल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात झालेल्या एका बैठकीत क्लीन अप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. कामात कसूर करणाऱ्या क्लीन अप मार्शल संस्थांना पालिका प्रशासनाने दंड लावला. बारापैकी सात कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून एकूण सुमारे ६५ लाख दंड लावण्यात आला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात पालिका प्रशासनाने सहा रुग्णालयाततून क्लीन अप मार्शल हद्दपार केले होते.

तक्रार आणि मदतीसाठी हेल्पलाईन सेवा

‘क्लीन अप मार्शल’ कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांना मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्रमांक ०२२ – २३८५५१२८ आणि ०२२ – २३८७७६९१ (विस्तारित क्रमांक ५४९/५००) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.