खड्डय़ांची कामे करण्यास विभागीय अभियंत्यांचा नकार; मनुष्यबळ पुरविण्यास रस्ते विभागाची टाळाटाळ
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळ्यात रस्त्यावर कमी खड्डे पडल्याचा दावा प्रशासन एकीकडे करीत आहे, तर दुसरीकडे पावसाच्या तडाख्यात रस्त्यांची चाळण झाल्यामुळे खड्डेविषयक तक्रारी स्वीकारून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विभागाकडे अधिक निवासी अभियंत्यांची नियुक्ती करण्याची मागणी विभाग कार्यालयांतील दस्तुरखुद्द साहाय्यक आयुक्त रस्ते विभागाकडे करू लागले आहेत. मात्र रस्ते विभागाने हात वर केल्याने रस्ते विभाग विरुद्ध विभाग कार्यालय असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, तर रस्ते घोटाळ्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्यामुळे विभाग कार्यालयांतील अभियंते खड्डेविषयक कामे करण्यास तयार नाहीत.
पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली झाल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तुलनेत पालिकेकडे आलेल्या खड्डय़ांच्या तक्रारी कमी आहेत. नागरिकांच्या खड्डेविषयक तक्रारी स्वीकारून त्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्ते विभागाने पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एका निवासी अभियंत्याची नियुक्ती केली असून त्यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध केले आहेत.
कार्यालयांच्या हद्दीमधील छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांची संख्या, त्यावर पडलेले खड्डे, त्याबाबत येणाऱ्या तक्रारी आणि खड्डय़ांची दुरुस्ती आदी कामांचे स्वरूप लक्षात घेता रस्ते विभागाने पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात किमान तीन-चार निवासी अभियंत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काही विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्तांनी रस्ते विभागाकडे केली आहे. आपल्या विभाग कार्यालयाचे क्षेत्र इतरांच्या तुलनेत अधिक असल्याने अधिक निवासी अभियंते नियुक्त करावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
रस्ते घोटाळ्यात दोन अभियंत्यांना झालेली अटक आणि अन्य दोन अभियंत्यांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई यामुळे विभाग कार्यालयांमधील अभियंते बिथरले आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या तक्रारी स्वीकारणे अथवा त्यांची दुरुस्ती करून घेण्याचे काम स्वीकारण्यास विभाग कार्यालयांतील अभियंते तयार नाहीत.
साहाय्यक आयुक्तांच्या या भूमिकेमुळे रस्ते विभाग पेचात पडला आहे. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये तक्रारी स्वीकारण्यासाठी तीन-चार अभियंत्यांची नियुक्ती केली तर रस्ते विभागाची कामे कशी काय करायची, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये सात ते आठ अभियंते नियुक्त आहेत. या अभियंत्यांना पावसाळ्यात विशेष काम नसते. त्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या तक्रारी स्वीकारणे, त्यांची कंत्राटदारांकडून दुरुस्ती करून घेणे, खड्डा योग्य पद्धतीने भरला आहे की नाही याची खातरजमा करणे आदी कामे या अभियंत्यांवर सोपवावी. त्यासाठी रस्ते विभागातील अधिक अभियंत्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता नाही, असे रस्ते विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा