घनकचरा विभागाच्या कारभाराचा मालवणीतील सात शाळांना फटका
‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत संपूर्ण शहर स्वच्छ करण्यास निघालेल्या महापालिकेच्या घनकचरा विभागाने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणाऱ्या शाळांच्या परिसरालाच कचराकुंडी बनविली आहे. मालवणीतील सातहून अधिक शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ व आजुबाजूच्या परिसरात पालिकेच्या पी उत्तर प्रभागातील घनकचरा विभागाकडून दररोज कचरा आणून टाकला जात आहे. कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडय़ा ठिकठिकाणाहून कचरा जमा करतात. त्यानंतर हा कचरा शाळांच्या परिसरात आणून मोठय़ा वाहनांमध्ये एकत्र केला जातो. परंतु, मोठय़ा वाहनांमधून हा कचरा नेईपर्यंत तो इथेच पडून असतो. या कचऱ्याच्या दुर्गंधीने विद्यार्थी-शिक्षक हैराण असून त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
मालवणी परिसरात सेंट पॉल, मालवणी उत्कर्ष विद्यालय, भारतमाता हायस्कूल, गुरुकुल हायस्कूल, शफाअत इस्लामिक स्कूल, मदर तेरेसा स्कूल, एमएचबी उर्दू स्कूल, सेकंडरी स्कूल या शाळा आहेत. या शाळांच्या परिसरात पालिकेच्या पी उत्तर प्रभागातील घनकचरा विभागातर्फे दररोज लहान घंटागाडीतून दुसऱ्या गाडीत कचरा संकलन केले जाते. बऱ्याचदा उरलेला कचरा शाळा परिसरात तसाच पडून राहतो. त्यामुळे शाळेच्या परिसराला कचराभूमीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांच्या पोटात अन्नाचा घासही नीट उतरत नाही. या वातावरणात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष तरी कसे लागणार, अशी तक्रार शिक्षक करत आहेत.
या प्रकाराबाबत पालिकेच्या पी उत्तर प्रभागाच्या घनकचरा विभागाकडे तक्रार करूनही संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ‘वंदे मातरम्’ शिक्षण संस्थेचे सचिव फिरोज शेख यांनी केला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे शाळेतील शिक्षक व पालकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थी व शिक्षकांनी रॅली काढून पी उत्तर पालिका विभाग परिसरात झाडूने साफसफाई करत अनोखे सत्याग्रह आंदोलन केले. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही. त्यामुळे येत्या १४ ऑक्टोबरला पुन्हा पी उत्तर पालिका विभागातील अधिकारी व अभियंत्यांचे बूट स्वच्छ करण्याचे आंदोलन करणार असल्याचे शेख यांनी सांगितले. याबाबत पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांची प्रतिक्रिया जाणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.