राज्यात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अजूनही मोठ्या संख्येनं रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण केल्या काही दिवसांमध्ये कमी झालं असलं, तरी रुग्णसंख्या अजूनही जास्त आहे. याशिवाय येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुंबई महानगर पालिका आणि त्यासोबतच पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या महानगर पालिकांच्या निवडणुका देखील संकटात सापडल्या आहेत. तिसऱ्या लाटेचा तडाखा ओसरण्यास उशीर झाला, तर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ या पूर्वनियोजित कालावधीमध्ये होणार नसल्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांमध्ये टीका देखील करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिका निवडणुकांचं गणित बिघडलं!

२०२० आणि २०२१ या दोन्ही वर्षांना करोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फटका बसला आहे. देशपातळीवर ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच काळात पार पडल्या असल्या, तरी राज्यातल्या महानगर पालिका निवडणुकांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये नियोजित असलेल्या नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण डोंबिवली यासारख्या महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता पुढील वर्षी २०२२मध्ये होऊ घातलेल्या ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबई या महत्त्वाच्या ५ महानगरपालिकांच्या निवडणुकांवर देखील करोनाचं सावट आहे.

 

काय म्हणाल्या महापौर?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. पण करोनाची परिस्थिती नियंत्रणात असली, तरच या निवडणुका होऊ शकतील. जर ही परिस्थिती नियंत्रणात नसेल, तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील”, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भाजपा आमदार आशिष शेलार यांनी “निवडणुका शक्य तेवढ्या पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे”, अशी टीका केली आहे.

 

वाचा सविस्तर – मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागणार?

कधी संपणार पालिकेची मुदत?

मुंबई महानगर पालिकेचा कार्यकाळ पुढील वर्षी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेणं आवश्यक आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई महानगर पालिकेने निवडणुकांची पूर्वतयारी सुरू करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली होती. तसे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून पालिकेला देण्यात आले आहेत. या तयारीमध्ये मतदान केंद्र, मुंबईतील प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणाच्या आधारावर वॉर्डची रचना मतदार याद्या अद्ययावत करणे अशा कामांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2022 may get postponed amid covid 19 pandemic says mayor kishori pednekar pmw