महापालिकांसाठी २१, तर जिल्हा परिषदांसाठी १६ व २१ फेब्रुवारीला मतदान; २३ रोजी निकाल

कुणी म्हणेल पाणी देऊ.. कुणी सांगेल रस्ता देऊ.. कुणी देईल आश्वासन, दिवाबत्ती करून देऊ; कुणी म्हणतील, आम्हीच करून दाखवलं.. कुणी म्हणतील, अच्छे दिन आम्हीच आता आणू.. कुणी म्हणतील, एकदाच द्या पूर्ण सत्ता, सुतासारखे सारे सरळ करू.. कुणी म्हणतील पुरे झाली यांची सत्ता, सत्तेसाठी पुढल्या सांगा आमचा पत्ता.. आश्वासनांचे बेत फक्कड असे रोज जमणार आहेत.. कारण, दिवस निवडणुकीचे सुरू आता झाले आहेत.. दिवस हे सुगीचे सुरू आता झाले आहेत.

मुंबापुरी, ठाणे आणि पुणे, नागपूर, महानगरांत दहा येईल प्रचारा पूर. तैशाच पंचवीस जिल्ह्य़ांमध्ये लढाई नाही दूर. शंख, बिगुल त्यासाठीचे वाजले आहेत,  दिवस सुगीचे सुरू आता झाले आहेत.

कुणापुढचे रस्ते होतील, कुणापुढची मैदाने सजतील. घरांना कुणाच्या लागतील रंग, ज्याचा त्याचा देण्याचा असेल आपला ढंग. कुणाला घडवतील सहली, कुणी करेल फुकटात रंजन, कॅलेंडरासोबत कुणी वाटेल दंतमंजन. तुमच्या आयुष्याची काळजी, वाहणारे आता खूप आहेत, दिवस हे सुगीचे सुरू आता झाले आहेत.

डोक्यावर घालण्यासाठी टोप्या आता बाहेर निघतील.. टोप्या खपतील. सदऱ्यांना होईल कडक इस्त्री, सदरे खपतील. झेंडे फडकतील, झेंडे खपतील. बिल्ले छापतील, बिल्ले खपतील. पत्रके छापतील, पत्रके खपतील. नोटाबंदीच्या गारठय़ामध्ये चलनऊब त्यांना मिळणार आहे..  दिवस हे सुगीचे सुरू आता झाले आहेत.

टेबले लागतील, जाजमे लागतील, आवाज आणि पोहोचायला आवाजाचे वर्धक लागतील. दिवे लागतील, सुतळी लागतील, खिळे, चुका, पकड, हातोडी छोटे मोठे सारे लागतील. खुच्र्या लागतील सभेसाठी, त्या खुच्र्यावर माणसे लागतील, प्रचारासाठी वडा, बर्गर, गार-गरम प्याले लागतील. सगळ्यासाठी या आता चलनवाले खपणार आहेत, दिवस हे सुगीचे सुरू आता झाले आहेत.

सुरू होतेय रणधुमाळी, लढाईच्या तारखा लागल्या आहेत, सगळ्याच फौजांनी आपल्या तोफा रणांगणात आणल्या आहेत. जिंकेल कोण, हरेल कोण, फेब्रुवारी २३ला निकाल सारे लागणार आहेत, काहीही होवो सगळ्यांसाठी, दिवस हे सुगीचे, सुरू आता झाले आहेत.

  • अमरावती महापालिकेत भाजपला गटबाजीपासून धोका
  • समन्वयाअभावी नागपूरमधील निवडणूक लांबणीवर
  • जिल्हा परिषदांमध्ये भाजपची कसोटी!
  • महापालिकांसाठी भाजप-सेनेतच रस्सीखेच!
  • जिल्हा परिषदांसाठी राष्ट्रवादीपुढे आव्हान

untitled-2

untitled-3