मुंबई महापौरपदाच्या निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना, शिवसेना-भाजप एकत्र येऊन देशात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करतील, असा विश्वास भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र येतील याची २०० टक्के खात्री आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. महापौर आमचाच असेल, अशी खात्री शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना आहे. दोन्ही पक्ष आपापल्या परीने ‘डाव’ टाकत आहेत. काँग्रेसनेही उमेदवार देण्याचा विचार केला आहे. काँग्रेसच्या खेळीने भाजपला जोरदार झटका बसेल, असे मानले जात आहे. कदाचित महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला अप्रत्यक्ष साथ देण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळली आहे, असे बोलले जात आहे. त्यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होत आहे. त्यात महापौरपदाच्या निवडणुकीबाबतची पक्षाची रणनिती काय असेल, याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केल्याने त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही पक्षांना मान्य होईल अशा ‘फॉर्म्युला’वर काम करत आहोत, असेही पाटील यांनी सांगितले. ते कोल्हापुरात बोलत होते. शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मुंबई महापालिकेसाठी सन्मानाने तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, भाजप-शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. त्यामुळे मुंबईत युतीचाच महापौर होणार आहे, असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत ५ वर्षे पूर्ण करणार, असेही ते म्हणाले होते. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांनीही सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांनी एकत्र यावे, असे म्हटले आहे.