मुंबईः हातगाडी बनावण्याचे साहित्य परत करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी महापालिका कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कर्मचाऱ्याने हातगाडी सोडवण्यासाठी सुरूवातीला १५ हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
याप्रकरणातील तक्रारदाराचा हातगाडी विक्री व भाडयाने देण्याचा व्यवसाय आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे हातगाडी बनवण्याचे औजार, तसेच इतर साहित्य महापालिकेच्या के- पूर्व कार्यालयातील रखरखाव विभागाने १८ जानेवारी २०२५ रोजी उचलून नेले होते. तक्रारदार यांनी के-पुृूर्व विभागात दुसऱ्या दिवशी जाऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची भेट झाली नाही.
त्यानंतर तक्रारदाराने २७ जानेवारी २०२५ ला के-पूर्व विभाग कार्यालयातील एका अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने तक्रारदाराचे सर्व साहित्य नष्ट करण्याची प्रक्रिया झाली असून आता कोणीही काहीच करू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी चौकशी केली असता त्यांचे हातगाडी बनवण्याचे साहित्य के-पूर्व विभागातील कर्मचारी विकत असल्याचे समजले. २७ मार्च रोजी ही माहिती मिळाल्यानंतर तक्रारदारांनी त्यांच्या परिचित व्यक्तीला संबंधित कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी पाठवले.
१५ हजार रुपयांची मागणी तक्रारदारांच्या सांगण्यावरून त्यांची परिचित व्यक्ती संबंधित कर्मचाऱ्याला भेटली. त्यावेळी त्याने दूरध्वनीवरून तक्रारदाराशी संपर्क साधला व तक्रारदारांना जे. बी. नगर मेट्रो स्थानकाजवळ भेटण्यास बोलावले. त्यानुसार तक्रारदारांनी त्या कर्मचाऱ्याची भेट घेतली असता त्यांने साहित्याच्या बदल्यात १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदारांकडे एवढी रक्कम नसल्यामुळे त्यांनी तडजोड करण्याबाबत कर्मचाऱ्याला विनंती केली. तडजोडीअंती १२ हजार रुपये स्वीकारण्यास त्याने होकार दिला. पंरतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे तक्रार नोंदवली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ कारवाई करून तक्रारीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.
पडताळणीत आरोपी कर्मचाऱ्याने ३ एप्रिल रोजी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली व ती स्वीकारण्यास होकार दिला. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ सापळा रचून संबंधित कर्मचाऱ्याला १२ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपी के-पूर्व विभागात श्रमिक पदावर कार्यरत आहे. त्यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर गुरूवारी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.