अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविणाऱ्या महापालिकेच्या एन वॉर्ड कार्यालयातील (घाटकोपर) दुय्यम अभियंत्याला अज्ञात महिलांनी गुरुवारी कार्यालयात जाऊन बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या दुय्यम अभियंत्याला राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी एन वॉर्डमध्ये बंद पाळण्याचा निर्णय अभियंत्यांनी घेतला आहे.
घाटकोपर येथील भटवाडीमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी दुय्यम अभियंते महेश फड गेले होते. स्थानिकांचा विरोध न जुमानता त्यांनी अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आणि ते आपल्या कार्यालयात परतले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही महिला फड यांच्या कार्यालयात दाखल झाल्या आणि त्यांनी फड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत फड गंभीर जखमी झाले असून त्यांना रक्तदाबाचा त्रासही होत आहे. त्यामुळे त्यांना राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. फड यांनी आपली छेडछाड केल्याची तक्रार महिलांनी पंतनगर पोलीस ठाण्यात नोंदवल्याचे समजते. दरम्यान, अभियंत्यांवर वारंवार हल्ले होत असून प्रशासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण देण्यात येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अभियंत्यांनी शुक्रवारी एन वॉर्डमध्ये काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा