मुंबई : मुंबई महानगरातील दुकाने व अस्थापनांवर मराठी नामफलक लावण्यासाठी व नियमानुसार बदल करण्यासाठी पालिका प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विविध व्यापारी संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाला विनंती केल्यानंतर प्रशासनाने ही मुदतवाढ दिली आहे.
दुकानांचे व उपाहारगृह आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत असावेत याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला होता. त्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने तयारी सुरू केली होती. सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. मराठी नामफलकाबरोबरच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत, असे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले होते. मुंबईतील सर्व आस्थापनांना नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला होता. नंतर हा कालावधी आठ- दहा दिवसांनी वाढवण्यात आला होता. मात्र विविध व्यापारी संघटनांच्या मागणीमुळे ही मुदत आता ३० जूनपर्यंत वाढवून देण्यात आली आहे.