मुंबई : उघड्यावर कचरा जाळल्यास आता खिशाला झळ बसणार असून असून मुंबई महापालिका एक हजार रुपये दंड आकारणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना याची जाणीव व्हावी म्हणून महानगरपालिकेने दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे. दिनांक १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
उघड्यावर कचरा जाळण्यास आळा बसावा म्हणून मुंबई महापालिकेने आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उघड्यावर कचरा जाळल्याने त्यातून विषारी वायू, राखेचे सूक्ष्म कण हवेत पसरतात. त्याचा परिणाम हवेच्या दर्जावर होतो आणि श्वसनाचे आजार बळावतात. आतापर्यंत उघड्यावर कचरा जाळताना कोणी आढळल्यास स्वच्छता उपविधी तरतुदीनुसार शंभर रुपये इतकाच दंड आकारला जात होता. दंडाची रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे नागरिकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यापुढे कोणी उघड्यावर कचरा जाळताना आढल्यास त्यास जागेवरच १ हजार रुपये इतका दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असे उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले.
घन कचऱ्याचे संकलन, वहन आणि विल्हेवाट आदी बाबींशी निगडीत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ चे कलम ४६२ (ईई) अंतर्गत बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ तयार करण्यात आले आहेत. हे अधिनियम लवकरच बदलण्यात येणार आहेत. म्हणजेच त्यामध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. त्यापैकी कचरा जाळणाऱ्यांवरील दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. अन्य नियमावली लवकरच नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दंड करण्यासाठी उपद्रव शोधकांचे पथक…
उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याचे विभाग कार्यालय (वॉर्ड) स्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. त्या पथकात घन कचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, उपद्रव शोधक (एनडी स्टाफ) आणि मुकादम अशा तिघांचा समावेश राहणार आहे. कचरा जाळण्याची शक्यता असलेल्या क्षेत्रांचे नियमित निरीक्षण आणि देखरेख करणे, उल्लंघन करणाऱ्यांना जागेवरच एक हजार रुपये दंड आकारणे तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत हे पथक जनजागृतीही करणार आहे.
दंडाच्या रकमेत दहा टक्के वाढ …..
सध्या, बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी उपनियम, २००६ अंतर्गत नियम ५.१० नुसार कचरा जाळण्यास मनाई असून, उल्लंघन केल्यास १०० रुपयांचा दंड ठोठावला जातो. तथापि, दंडाच्या नाममात्र रकमेमुळे कदाचित अंमलबजावणी अप्रभावी राहते. शिवाय, अनेक भागात, विशेषतः उघड्या भूखंडांवर, बांधकाम स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या भागात, सुकी पाने आणि मिश्र कचरा व इतरही साहित्य जाळलेले आढळते. अशा प्रकारे उघड्यावर कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारी वायू प्रदूषणाची समस्या लक्षात घेता आता उघड्यावर कचरा जाळण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता दंडाची रक्कम १०० रुपयांवरून १ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.