मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेने मोठा झटका दिला आहे. लालबागचा राजा मंडळाच्या आयोजकांना पालिकेने तब्बल तीन लाख ६६ हजारांचा दंड ठोठावला आहे. खड्ड्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने १८३ खड्ड्यांसाठी लालबागचा राजा मंडळाला जबाबदार धरलं असून, त्यासाठीच हा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लालबागचा राजा मंडळाला पालिकेकडून यासंबंधीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब रोड ते टीबी कदम मार्गावर अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचा उल्लेख आहे.
मुंबईत दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असतो. यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना मुंबई महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. पालिकेने आखून दिलेल्या नियमांचं पालन करणं या मंडळांसाठी बंधनकारक असतं. अनेकदा मंडप उभारताना काही मंडळांकडून रस्त्यात खड्डे केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.