मुंबई : तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकाच पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे एका बाजुला मुंबई महापालिकेत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या निश्चित असताना दुसरीकडे पालिकेतील माजी उपायुक्त उल्हास महाले यांना मात्र सेवानिवृत्तीनंतरही पालिकेत एक वर्षांसाठी उपायुक्तपदी (पायाभूत सुविधा) मुदतवाढ मिळाली आहे. नगरविकास विभागाने तसे पत्र काढले आहे. त्यामुळे महाले हे पहिले कंत्राटी उपायुक्त ठरणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सायबरगुन्हे हेल्पलाइनद्वारे ५० कोटी वाचवण्यात यश

मुंबई महापालिकेचे पायाभूत सुविधा विभागाचे माजी उपायुक्त उल्हास महाले नियत वयोमानानुसार १ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. ३१ जानेवारी हा त्यांच्या महापालिकेच्या सेवेतील अखेरचा दिवस होता. सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्याकडे पालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती. रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे, पूल विभागाची कामे, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, गोखले पूल, विद्याविहार पूल, दहिसर – भाईंदर जोडरस्ता असे मोठमोठे प्रकल्प त्यांच्याकडे होते. मात्र महाले सेवानिवृत्त होत असल्यामुळे नियम डावलून त्यांना मुदतवाढ देण्यासाठी गुप्तपणे हालचाली पालिका प्रशासनात सुरू होत्या. आतापर्यंत पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या काही अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काही काळासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र महाले यांना थेट सेवा कालावधी वाढवून देण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवरून सुरू होत्या. त्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमात आल्यानंतर हा विषय तात्पुरता थांबला होता. मात्र नंतर पुन्हा पालिका आयुक्तांनी नगरविकास विभागाला उपायुक्तांचा सेवा कालावधी वाढवण्यासाठी पत्र लिहिले होते. कंत्राटी पद्धतीने ही मुदतवाढ द्यावी असा प्रस्ताव पालिकेने राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार नगर विकास विभागाने १६ मार्च रोजी आदेश काढून महाले यांच्या करार पद्धतीने नियुक्तीस मान्यता दिली आहे.

हेही वाचा >>>साई रिसॉर्टच्या बांधकामाचे प्रकरण : सत्ताधाऱ्यांना केवळ विरोधकांवरच कारवाई करण्यात स्वारस्य

अभियांत्रिकीच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून ….

येत्या काळात पालिकेची अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यात सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांसह गोखले पूल, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, दहिसर भाईंदर जोडरस्ता प्रकल्प, महालक्ष्मी पूल, यांत्रिकी वाहनतळ, कर्नाक पूल, विद्याविहार पूल, मिठी नदीे, दहिसर नदीचे पुनरुज्जीवन अशी कामे महाले यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत सुरू होती. ही कामे १ ते ४ वर्षे चालणारी आहेत. महाले यांच्या अभियांत्रिकी कामाचा ३३ वर्षांच्या अनुभवाने ही कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे महाले यांची आवश्यकता असून त्यांचे ज्ञान, प्रभुत्व लक्षात घेता त्यांच्या सेवेची मुंबई महापालिकेला नितांत आवश्यकता असल्याचे राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे विहित कार्यपद्धतीतील अटी शिथिल करून महाले यांना सेवा करार पद्धतीने एक वर्षासाठी नियुक्ती करण्याची विनंती पत्रात केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc former deputy commissioner ulhas mahale get extension of one year after retirement mumbai print news zws