राज्यात स्वाइन फ्ल्यूची साथ हळूहळू पसरत असून दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ज्वराची लक्षणे असलेल्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
ताप, घसादुखी, घशात खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी या त्रासाने अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. ज्वराच्या या लक्षणांमुळे त्रस्त असलेले अनेक रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जात आहेत. त्यामुळे या साथीच्या प्रादुर्भावाचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षी साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांची नोंद पालिकेचे अधिकारी घेत होते. मात्र यंदा ही पद्धत बंद करण्यात आल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. केवळ पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या पालिकेच्या दफ्तरी आहे.
रुग्णांनी ताप, सर्दी, खोकला अंगावर काढू नये. वेळीच डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावेत. मधुमेह, हृदयरोग, अथवा असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवात उसळणाऱ्या भाविकांच्या गर्दीत फ्ल्यूने त्रस्त असलेल्या रुग्णांनी जाऊ नये. त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढण्याची भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा