मुंबई : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तींवर बंदी घालण्यास अखेर माघी गणेशोत्सवाचा मुहूर्त मिळाला. माघी गणेशोत्सवात पीओपी मूर्तींना पूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याचे हमीपत्र द्यावे लागेल. मात्र, ऐन उत्सवाच्या तोंडावर ही घोषणा केल्यामुळे सार्वजनिक मंडळे, ‘पीओपी’ मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच घरगुती गणेशमूर्ती स्थापन करणाऱ्या कुटुंबांसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘पीओपी’ मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. मात्र, विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. बंदी घालून चार वर्षे झाली तरी सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांना पीओपीच्या वापरापासून प्रवृत्त करण्यासाठी राज्य सरकारसह अन्य यंत्रणा अपयशी ठरल्या. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिका, राज्य सरकार यांच्या भूमिकेवर वारंवार ताशेरे ओढले होते.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका प्रलंबित असून ऑगस्ट २०२४च्या सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक मंडळांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्याच महिन्यात याबाबत बैठकही घेतली होती. तसेच यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के ‘पीओपी’बंदीचा निर्णय लागू करण्याचे ठरवले आहे. तसेच परिपत्रकही महापालिकेने काढले आहे. यंदा १ फेब्रुवारीला माघी गणेशजयंती आहे. उत्सवाला २० ते २५ दिवस शिल्लक असताना घाईघाईत काढलेल्या या निर्णयामुळे मात्र नेहमीप्रमाणे गोंधळाची शक्यता आहे.
मंडळे संभ्रमात…
गेल्या काही वर्षांपासून माघी गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मुंबईत सुमारे साडेतीन हजार मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात आणि १५ ते २० फुटांची मूर्ती आणतात. यावेळी एवढी मोठी मूर्ती आणायची की नाही, मोठी मूर्ती आणायची असल्यास मातीची मूर्ती कशी आणणार, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.तसेच अनेक मंडळांनी आणि घरगुती गणेशमूर्ती ठेवणाऱ्यांनीही मूर्तीची नोंदणी केली आहे. काहींनी आगाऊ पैसे दिले आहेत.
कांदिवलीतील चारकोपमध्ये १९ वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या चारकोपचा राजा मंडळाचे अध्यक्ष निखिल गुढेकर यांनी सांगितले की, मंडळाची मूर्ती उंच असते व दरवर्षी एक ठराविक पद्धतीची मूर्ती असते. तिची मागणीही नोंदवून झाली आहे. आमचे मूर्तिकारही अनेक वर्षांपासून एकच आहेत. ‘पीओपी’ची मूर्ती घडवणारे कलाकार वेगळे, मातीच्या मूर्ती घडवणारे वेगळे असतात. अचानक आलेल्या या निर्णयामुळे आमच्यापुढे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा श्रद्धेचा विषय असून अचानक मूर्ती लहान करणे, बदलणे शक्य होणार नाही.
हेही वाचा…कांदिवलीत महिलांसाठी फिरते स्नानगृह; भारतातील पहिलेच मोबाइल बाथरूम
‘कागदी बंदी नको’
पीओपी मूर्तींना विरोध करणाऱ्या आणि शाडूच्या मातीपासून मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. श्री गणेश मूर्तिकला समितीचे अध्यक्ष वसंत राजे याबाबत म्हणाले की, कागदी बंदी नको. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला पालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जेवढे अधिक महत्त्व देत आहेत त्याच धर्तीवर जल प्रदूषणाचाही विचार झाला पाहिजे. पीओपी मूर्ती बंदीचा कायदा करून पीओपी मूर्ती निर्माते व विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई गरजेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘उंचीवरच मर्यादा आणा’
‘पीओपी’च्या मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माघी गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करून झाल्या आहेत. आता केलेल्या मूर्तींचे काय करायचे, असा सवाल मूर्तिकार अनिल बाईंग यांनी केला. ‘पीओपी’बंदीचा निर्णय योग्य असला तरी मोठ्या उंचीच्या मूर्ती मातीच्या घडवणे आणि नेणे शक्य नाही. मातीच्या मूर्ती बनवायला वेळही खूप लागतो, तितका वेळही आता उरलेला नाही. त्यामुळे सरकारने एकतर मूर्तीच्या उंचीवरच मर्यादा आणावी असे ते म्हणाले. ‘पीओपी’च्या मूर्ती विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर येतात. पण मातीच्या मूर्ती समुद्राच्या तळाशी साठून राहतील याचाही विचार व्हायला हवा, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.