मुंबईची रोज वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यानुसार गरज असलेला पाणीपुरवठा हे ‘गणित’ बिघडत चालल्यामुळे अनेक भागात लोकप्रतिनिधींना लोकांना तोंड दाखवणे कठीण होत चालले आहे. त्यातच शंभर वर्षांपूर्वीच्या शहरातील जुन्या पाईपलाईन बदलण्याचे आव्हान व त्यातून होणारा दुषित पाण्याचा पुरवठा यामुळे प्रामुख्याने नागरिक त्रस्त आहेत. महापालिका मुंबईला दररोज ३४७५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करते, पण त्यापैकी २६ टक्के म्हणजे १४५० दशलक्ष लिटर पाण्याची चोरी व गळती होते. यामुळे महापालिकेचे सुमारे सहाशे कोटी रुपयांचे नुकसान होत असून हे रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे.
महापालिकेने मुंबईसाठी २०१४ ते ३४ या वीस वर्षांसाठीचा प्रस्तावित विकास आराखडा तयार केला असून यातील पाणी पुरवठय़ाच्या भागाचा विचार केल्यास राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यासारखा त्याचा ‘चेहरा’ आहे. मुंबईमध्ये एकूण ३,६१,८६२ जलजोडण्या असून त्यापैकी ३,०३,१५८ घरगुती जोडण्या आहेत. यात एक लाख ८० हजार जोडण्या या झोपडपट्टय़ांमध्ये असून ५३,५२७ व्यावसायिक जोडण्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या जलविभागाकडे आज अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांची हजारो पदे रिक्त आहेत. विभागवार मुकादम आणि त्यांच्या टीमचा एकूण जलजोडण्याच्या संख्येशी तुलना केल्यास हा विभाग केवळ देवाच्या भरवशावर चालला आहे असे दिसते. अनधिकृत झोपडय़ा वाढत आहेत तसे चोरीचे प्रमाणही वाढत आहे. २००८-०९साली पिण्यास अयोग्य नमुन्यांचे प्रमाण १३.८ एवढे होते ते २००९-१० मध्ये २६.१ टक्के एवढे झाले, त्यानंतरच्या वर्षी हे प्रमाण २९ टक्क्य़ांवर गेले.
त्याचप्रमाणे वाहतुकीची समस्या मुंबईपुढे आ वासून उभी आहे. रस्त्यावरील दोन व चार चाकी गाडय़ांचे प्रमाण लक्षात घेता मुंबईतील वाहतुकीचा वेग हा ताशी वीस किलोमीटर एवढा आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावी करण्यासाठी कोस्टल रोडच्या ऐवजी कोस्टल रेल्वे केल्यास वाहतुकीची मोठी समस्या सुटू शकेल असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. मुंबईतील प्रत्येक मोकळ्या जागेवर बिल्डर आणि झोपडपट्टी दादांकडून ‘डाका’ घालण्यात येत असल्यामुळे मुंबईचा ‘श्वास’ घुसमटत चालला आहे. मुंबईची लोकसंख्येची घनता प्रतीचौरस किलोमीटर २०,६९४ एवढी भयावह आहे, तर मोकळ्या जागेचे प्रमाणे केवळ २६ टक्के एवढेच आहे. प्रस्तावित विकास आराखडय़ात हा ‘श्वास’ आणखी ‘मोकळा’ करण्याची कोणतीही योजना नाही.