तब्बल १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी मुंबई महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांची मानसिक आणि शारीरिक काळजी घेणाऱ्या सर्वसमावेशक धोरणास संमती दिली. असे धोरण असणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी स्थानिक पातळीवर ७५० चौरस फुटाची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. आता नगरसेवक निधीमधून विरंगुळा केंद्र उभारण्याची मुभा मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकांसाठी पालिका शाळांतील वर्गखोल्या विनाशुल्क मिळणार आहेत. तसेच कार्यक्रमांच्या आयोजनासाठी २५० रुपये शुल्कात पालिका शाळांचे सभागृहही देण्यात येईल. पालिका शाळांचे ग्रंथालय, ३५ उद्यानांमधील ठरावीक जागा संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती या धोरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपचे विनोद शेलार यांनी दिली.
धोरणातील तरतुदींनुसार आठवडय़ातून एकदा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. चाळींमधील थकलेल्या वृद्धांसाठी घरातच शौचालय बांधण्यासाठी झटपट परवानगी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक मोठय़ा प्रकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षण ठेवण्याची तरतूद विकास आराखडय़ात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठळक सुविधा
* ज्येष्ठांसाठी ७५० चौ. फुटांचे विरंगुळा केंद्र
* ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकांसाठी पालिका शाळेच्या खोल्या विनामूल्य.
* कार्यक्रमांसाठी २५० रुपयांत पालिका सभागृहे
* ३५ उद्यानांतील ठराविक जागा आरक्षित
* पालिका ग्रंथालयांचीही सुविधा – वृत्त/३
मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांची मानसिक व शारीरिक काळजी घेणाऱ्या सर्वसमावेशक धोरणास मुंबई महापालिकेने सोमवारी मंजुरी दिली. असे धोरण अमलात आणणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका आहे.