मुंबई : ऑक्टोबरपासून राज्यामध्ये झिकाचे पाच रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ऑक्टोबरपासून इचलकरंजीमध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळले आहेत, तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शेजारील कर्नाटकमध्येही या आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : अर्जात दुरुस्ती करण्याचा पर्याय
मृत्यूचे प्रमाण अत्यल्प..
झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावेत. या आजारासाठीचे सर्वोत्तम उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे.
संसर्ग कशामुळे?
झिका विषाणू हा ‘फलॅव्हीव्हायरस’ प्रजातीचा असून, तो एडिस डासांमार्फत पसरणारा आजार आहे. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने लैंगिक संपर्क, गर्भाद्वारे संक्रमण, रक्त आणि प्रत्यारोपणाद्वारे, आईपासून रक्त संक्रमण होते.
निदान व उपचार
नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी डेंग्यू आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त २ ते ८ तापमानात शीतशृंखला अबाधित ठेवून तपासणीसाठी पाठवावे. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी. पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे.