रुग्णांना नाश्त्यासाठी पावाचाच पुरवठा; खर्च परवडत नसल्याची पालिका प्रशासनाची सबब
एकीकडे पाव किंवा ब्रेड हे पदार्थ शरीराला अपायकारक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत असताना शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयाचा अपवादवगळता मुंबई महापालिकेच्या अन्य रुग्णालयांत रुग्णांना सकाळ, संध्याकाळी नाश्त्याला पावच दिला जात आहे. शिवडीच्या टीबी रुग्णालयात रुग्णांना सकाळच्या नाश्त्यात पावाऐवजी पोहे, उपमा यांसारखे पौष्टिक पदार्थ देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अन्य ठिकाणी हे पदार्थ देण्यासाठी लागणारा खर्च परवडणार नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबईतील पाव उत्पादक कॅन्सरला निमंत्रण देणारे ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे घातक रसायन पावात वापरत नसले तरी मैद्यापासून तयार केला जाणारा पाव पचनासाठी जडच असतो. आजारपणात रुग्णाची पचनशक्ती आधीच खालावलेली असते. तरीही पोहे, उपमा किंवा चपात्यांचा खर्च परवडत नाही म्हणून पालिका रुग्णालयांमध्ये आहारतज्ज्ञांनी निषिद्ध ठरविलेला पावच नाश्त्याला दिला जातो. काही दिवसांपूर्वी शिवडीच्या टीबी रुग्णालात रुग्णांना सकाळचा पावाचा नाश्ता बदलून पोहे, उपमा यांसारखे पौष्टिक पदार्थ देण्यास सुरुवात केली गेली. या बदलाचे आरोग्य व आहार तज्ज्ञांकडून स्वागत केले जात असून रुग्णांना पाव देण्याऐवजी घरगुती पौष्टिक नाश्ता देणे केव्हाही उपयुक्त असल्याचे त्यांचे मत आहे. परंतु, आजही पालिकेच्याच नव्हे तर सरकारी रुग्णालयांमध्येही पावच रुग्णाची क्षुधातृप्ती करतो आहे.
मुंबई पालिकेच्या अखत्यारीत येणारे शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, परळचे राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम) आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय या महत्त्वाच्या तीन रुग्णालयांत सकाळी रुग्णांना नाश्त्याला पाव दिला जातो. तर काही रुग्णालयात सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी नाश्त्यासाठी पाव दिला जातो. मुंबईतील पालिका रुग्णालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपचाराकरिता रुग्ण येत असतात. राहण्याची सोय नसल्याने अनेक रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर राहतात. अशा रुग्णांना घरगुती पौष्टिक अन्नपदार्थ मिळणे अशक्य असते. त्यामुळे हे रुग्ण पूर्णत: रुग्णालयातील अन्नपदार्थावर अवलंबून असतात. अनेक रुग्णांना पावापेक्षा घरगुती नाश्ता मिळावा अशी अपेक्षा असतानाही पर्याय नसल्यामुळे त्यांना पावावरच समाधान मानावे लागते. आहाराच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता हा सकस आणि भरपेट असावा असा आहारतज्ज्ञांचा सल्ला असतानाही पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना मात्र घातक पावाचे सेवन करावे लागत आहे.

पावातील काबरेहायड्रेटस, ग्लुकोजच्या अतिप्रमाणामुळे शरीरावर घातक परिणाम होतात. पावाची निर्मिती मैद्यापासून केली जाते आणि मैद्याचे पचन होण्यास जास्त कालावधी लागत असून याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. पोटाचा आजार किंवा पोटाची शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांनी पाव खाणे योग्य नाही.
– डॉ. रत्नाराजे थर, आहारतज्ज्ञ

काही दिवसांपासून कूपर आणि शिवडी टीबी रुग्णालयात सकाळी नाश्त्यासाठी पावाऐवजी पोहे, उपमासारखे सकस अन्न दिले जात आहे. मदतीसाठी एखादी संस्था पुढे आली तर सर्वच रुग्णालयांत रुग्णांना पावाऐवजी उपमा, पोहेसारखे घरगुती अन्न देता येईल.
-अविनाश सुपे, अधिष्ठाता, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम)

Story img Loader