मुंबई : पित्तनलिकेत खडे झाल्यास, पित्तनलिका अरुंद झाल्यास किंवा बंद झाल्यास पित्ताचा त्रास होऊन काविळसारखा आजार होतो. अशा रुग्णांच्या पित्तनलिकेमध्ये एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड चोलांगिओपॅन्क्रिएटोग्राफीचा (ईआरसीपी) वापर करण्यात येतो. मोठ्या व्यक्तींप्रमाणे लहान मुलांमध्येही याच नळीचा वापर करण्यात येत असला तरी लहान मुलांसाठी ती वापरणे अनेकदा त्रासदायक ठरते. ही बाब लक्षात घेता आता नायर रुग्णालयात पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोप उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता दीड वर्षांपासून पुढील लहान मुलांच्या पित्तनलिकेतील अडथळे दूर करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा : लंडनहून वाघनखे मुंबईत येण्यास विलंब; नोव्हेंबर, जानेवारीचा वायदा चुकला, आता मे महिन्याचा मुहूर्त
शरीरात तयार होणारे पित्त हे पित्तनलिकेद्वारे शरीरात वाहत असते. मात्र अनेक कारणांमुळे पित्तनलिकेत खडे तयार होतात किंवा पित्तनलिका अरूंद होते. अशावेळी पित्तनलिकेतून वाहणारे पित्त हे नलिकेबाहेरून वाहण्यास सुरुवात होते. त्यामुळे ते हळूहळू संपूर्ण शरीरात पसरण्यास सुरुवात होते. परिणामी काविळसारखा आजार होतो. अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करण्याबरोबरच एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड चोलांगिओपॅन्क्रिएटोग्राफीचा (ईआरसीपी) वापर करण्यात येतो किंवा शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र पित्तनलिकेवरील शस्त्रक्रिया ही किचकट व रुग्णासाठी त्रासदायक ठरते. त्यामुळे ईआरसीपीचा वापर करण्याला डॉक्टरांकडून प्राधान्य दिले जाते. याचा वापर प्रौढ व्यक्तींसाठी केला जातो. मात्र लहान मुलांसाठी विशेष नळी उपलब्ध नसल्याने किंवा उपलब्ध असलेली नळी ही महागडी असल्याने डाॅक्टरांकडून काही प्रमणात लहान मुलांसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र लहान मुलांमध्येही पाच वर्षांवरील मुलांसाठीच त्याचा वापर केला जातो. त्यामुळे पाच वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांवर उपचार करणे अवघड होते. मात्र लहान मुलांवर उपचार करता यावेत यासाठी आता नायर रुग्णालयाने पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोप तंत्राचा वापर करणारे नायर रुग्णालय हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरणार आहे.
हेही वाचा : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतही गुन्हा दाखल
पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोप महागडा असल्याने त्यासाठी येणारा खर्च हा ५० हजारांपेक्षा जास्त असतो. मात्र नायर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया माेफत होणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोपच्या माध्यमातून तोंडाद्वारे नळी अन्ननलिकेद्वारे शरीरात टाकण्यात येते. त्यानंतर ती नळी जठर व पित्ताशयापर्यंत नेण्यात येते. यासाठी अवघे काही तास लागतात. रुग्णांना एक ते दोन दिवसच रुग्णालयात राहावे लागणार आहे. सध्या नायर रुग्णालयामध्ये वर्षाला पाच ते सहा रुग्ण येतात. मात्र हे तंत्र उपलब्ध झाल्यावर पालिकेच्या अन्य रुग्णालयातील रुग्णांवरही उपचार शक्य होतील. तसेच आता दीड वर्षांवरील बालकांच्या पित्तनलिकेतील खडे काढणे किंवा पित्तनलिका रूंद करणे शक्य होणार आहे, असे जठरांत्रविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण राठी यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर आणि मध्यवर्ती खरेदी कक्षाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
हेही वाचा : गोष्ट मुंबईची, भाग १४२: भूराजकीय महत्त्वाचे गेटवे ऑफ इंडिया आहे तरी कुठे?
“पिडिॲट्रिक स्लिम ड्युओडेनोस्कोप ही पद्धत फारच महागडी आहे. मात्र नायर रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना याचा लाभ होईल. या पद्धतीचा जास्तीत जास्त मुलांना लाभ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.” – डॉ. सुधीर मेढेकर, अधिष्ठाता, नायर रुग्णालय