संदीप आचार्य

उच्चरक्तदाब व मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजाराची माहिती वेळीच मिळून उपचार सुरू झाल्यास हृदयविकार, मूत्रपिंडविकारासह विविध आजार टाळता येतील, अशी भूमिका घेत मुंबई महानगरपालिकेने पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने झोपडपट्टी विभागासाठी मुंबईतील महानगरपालिकेच्या आरोग्य दवाखान्यांमध्ये उच्च रक्तदाब तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी झोपडपट्टी विभागातील दवाखाने रात्री दहावाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत असून लवकरच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण व त्यांच्याबरोबर येणाऱ्या तीशीपुढील प्रत्येक व्यक्तीची रक्तदाब चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे निदान झाल्यास त्यांना तात्काळ मोफत औषधेही देण्यात येणार आहेत. उच्च रक्तदाब तपासणीबरोबरच आगामी काळात मधुमेह व कर्करोग तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

भारतात गेल्या दोन दशकात उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. १९९० साली देशातील लोकसंख्येच्या ५.१ टक्के नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात २०१६ साली वाढ झाली असून आता हे प्रमाण १०.५ टक्क्यांवर पोहोचल्याचे आढळून आले आहे. ‘आयसीएमआर’ने केलेल्या पाहाणीत २०२२ मध्ये देशातील २८.५ टक्के उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी १४.५ टक्केच जण या आजारासाठी योग्य औषधे घेत असल्याचे दिसून आले. त्यापैकी १२.६ टक्के रुग्णांचाच रक्तदाब नियंत्रणा आला असून अन्य नागरिक याबाबत पुरेसे सजग नसल्याचे आढळून आले आहे. याशिवाय आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याची कल्पना नसलेल्यांची संख्या फार मोठी आहे.

वाढत्या ताणतणावामुळे शहरी भागात उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांचे प्रमाण ग्रामीण भागातील नागरिकांच्या तुलनेत खूप जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत विविध आरोग्य विषयक संस्थांनी उच्च रक्तदाब, मधुमेह, तसेच अन्य असंसर्गजन्य आजारांच्या वाढत्या रुग्णांची व त्यातून होणाऱ्या मृत्युंची गंभीर दखल घेतली असून वेळोवेळी उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. या दोन आजारांमुळे संबंधित रुग्णाला हृदयविकार, मूत्रपिंडविकार, हृदयाचे अनियमित ठोके पडणे, डोकेदुखीपासून अनेक आजार उद््भवतात. या असंसर्गजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू व उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही या आजारांना नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतही उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधणे व त्यांना औषध घेण्यास भाग पाडणे हे मोेठे आव्हान मुंबई महानगरपालिकेपुढे आहे. मुंबईत आजघडीला अंदाजे २० लाखांहून अधिक रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचा, तसेच यातील तीन लाख लोकांना याची कल्पना असून त्यापैकी दहा टक्के लोकच औषधोपचार घेत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीवकुमार यांनी मुंबईत युद्धपातळीवर उच्च रक्तदाबाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्रात, तसेच अन्य भागात महानगरपालिकेच्या दवाखान्यांच्या माध्यमातून रक्तदाबाचे रुग्ण शोधण्यास सुरुवात केली आहे.

महानगरपालिकेचे मुंबईत १९० दवाखाने व दहा ‘पोर्टा केबीन’ असून येथे तीशीपुढील प्रत्येक रुग्ण व त्याच्यांबरोबर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या उच्च रक्तदाबाची नोंद केली जाते. ज्यांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आल्यास त्याची कल्पना देऊन तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात येतो. याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना विचारले असता, उच्च रक्तदाब व त्यातून उद््भवणारे मोठे आजार यांचा विचार करता ही मोहीम राबवणे अत्यावश्यक होते. जवळपास साठ लाख लोक गरीब वस्त्यांमध्ये राहात असल्याने व त्यातील मोठी संख्या या आजाराविषयी अनभिज्ञ असल्याचे लक्षात घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या दवाखान्यांच्या माध्यमातून रक्तदाब तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

तीस वर्षांवरील प्रत्येकाची नियमित उच्च रक्तदाब तपासणी होणे गरजेचे असून आगामी काळात यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे. यापुढे उपनगरीय रुग्णालये, तसेच मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रमुख रुग्णालयांमध्ये येणाऱ्या तीशीपुढील प्रत्येक रुग्ण व त्यांच्याबरोबरील व्यक्तींचा उच्चरक्तदाब तपासण्यात येईल. यासाठी महानगरपालिकेने उच्च रक्तदाब तपासणी करण्यासाठी सहा हजार उपकरणांची खरेदीही केली असून आशा कार्यकर्त्या, तसेच आरोग्य सेवक मिळून साडेचार हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही मंडळी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना तसेच गरीब वस्तीत घरोघरी जाऊन उच्च रक्तदाबाविषयी माहिती देऊन तपासणी करतील. तसेच ज्यांना हा आजार असल्याचे आढळून येईल त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून औषधेही दिली जातील असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

मुंबईत तीस वर्षावरील नागरिकांची संख्या साधारणपणे ६० लाख एवढी असून पुढील टप्प्यात आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन उच्च रक्तदाबाची तपासणी करणार आहोत. आजघडीला महानगरपालिकेच्या केईम रुग्णालयात रोज बाह्यरुग्ण विभागात ७,५०० रुग्ण येतात. तर शीव रुग्णालयात ७,००० व नायर रुग्णालयात साधारणपणे ५,००० रुग्ण येतात. या सर्वांचा उच्चरक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालये, तसेच महानगरपालिकांच्या दवाखान्यांचा विचार करता वर्षाकाठी सुमारे दोन कोटी रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असताता. यात केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातून व अन्य राज्यातूनही रुग्ण महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. याचा विचार करून भविष्यात केवळ उच्च रक्तदाब तपासणी करून आम्ही थांबणार नाही तर मधुमेह व कर्करोग तपासणीही करणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

Story img Loader