मुसळधार पावसात जमीनदोस्त झालेली माहीम येथील अल्ताफ मेन्शन ही इमारत धोकादायक होती. तिची दुरुस्ती आवश्यक होती आणि तशी तक्रारही आम्ही पालिकेच्या विभाग कार्यालयाला गेल्या सहा वर्षांत तीनदा दिली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही, असा आरोप अल्ताफ मेन्शनमधील रहिवाशांनी केला. याबाबतची सर्व कागदपत्रेही रहिवाशांनी आयुक्त सीताराम कुंटे यांना सादर केली.
या दुर्घटनेत दहाजण ठार झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर पालिका अधिकारी आणि रहिवासी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी इमारतीच्या रहिवाशांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली. या वेळी रहिवाशांचे वकील रिझवान र्मचट हेदेखील उपस्थित होते. रहिवाशांनी या वेळी पालिका आयुक्तांना या इमारतीबाबतची सर्व कागदपत्रे दिली.
अल्ताफ मेन्शन ही इमारत धोकादायक आहे, अशी तक्रार आपण सन २००८, २००९ आणि २०१२ अशी तीन वर्षे सातत्याने पालिकेकडे केली होती, असे या रहिवाशांनी सांगितले. या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी पालिका आयुक्तांना सादर केल्या. या तक्रारींची कोणतीही दखल पालिका अधिकाऱ्यांनी घेतली नाही, असा आरोपही रहिवाशांनी केला. इमारत धोकादायक असतानाही तक्रारीची दखल न घेता हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल वॉर्ड ऑफिसर, सहाय्यक अभियंता यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Story img Loader