निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसवून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे, तसेच या कंपनीला पुढील सहा महिने कोणतेही काम देऊ नये, असे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
कुर्ला परिसरातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम महावीर इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला देण्यात आले होते. रस्त्यांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी त्रयस्थ पक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या एसजीएल कंपनीने या कामाची तपासणी केल्यानंतर तेथे निकृष्ट दर्जाचे पेव्हर ब्लॉक बसविल्याचे निष्पन्न झाले. परिणामी प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. या समितीनेही तसाच अहवाल दिला.
इतकेच नव्हे तर बनावट कागदपत्रांचा आधारही या कामात घेण्यात आल्याचे समितीला आढळून आले. तसेच पेव्हर ब्लॉक जकात न भरताच मुंबईत आल्याचेही स्पष्ट झाले. जकात चुकवेगिरी केल्याबद्दल महावीर इन्फ्रा प्रोजेक्टला २ लाख रुपये दंड करावा, बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल फोजदारी गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस या समितीने पालिका आयुक्तांकडे केली होती.
या शिफारसींचा आधार घेऊन सीताराम कुंटे यांनी महावीर इन्फ्रा प्रोजेक्टला सहा महिने कोणतेही काम देऊ नये असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर या कंपनीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पोलीस चौकशीमध्ये ही कंपनी दोषी आढळल्यास या कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा