मुंबई : मुंबईतील हवेच्या ढासळता दर्जा आणि त्यामुळे आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याची दखल महापालिकेपाठोपाठ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही घेतली आहे. झोपु प्राधिकरणाने यासाठी अभियंत्यांची नियुक्ती केली असून आतापर्यंत प्रदूषण करणाऱ्या दोनशेहून अधिक प्रकल्पांवर नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही या प्रकल्पांतील विकासकांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास बांधकामांना स्थगिती देण्याची कारवाई करण्याचे ठरविले आहे.
महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश देत, काही परिसरात हवेचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत बांधकामांवर निर्बंध आणले आहेत. झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही सलग आढावा बैठक घेऊन हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. प्रत्येक विभागातील अभियत्यांची नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांची माहिती गोळा करण्याचे आदेश या अभियंत्यांना देण्यात आले आहेत. या अभियंत्यांनी नोटिसा बजावण्यात आलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्षात हवा गुणवत्ता निर्देशांकाची तपासणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. वाईट वा अतिवाईट श्रेणीतील बांधकामांना तात्काळ स्थगिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा >>> पानसरे हत्या प्रकरण : प्रकरणाच्या तपासावर देखरेख सुरू ठेवायची आवश्यकत नाही
झोपु प्राधिकरणाने आतापर्यंत दोनशेहून अधिक प्रकल्पांना नोटिसा दिल्या आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. ठराविक उंचीपर्यंत हरित कापडी आच्छादन तसेच सतत पाण्याचा फवारा मारून हवेतील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना या प्रकल्पातील विकासकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांतील बांधकामांना स्थगिती देण्यात येणार आहे. यावर सतत नियंत्रण ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांची संख्या शून्य करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> २० टक्के योजनेतील पाच हजार घरांचा प्रश्न
गेल्या काही दिवसांत हवेतील प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. झोपु प्राधिकरणाने त्याआधीच सर्वच प्रकल्पांना प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. बहुसंख्य प्रकल्पातील विकासकांनी काळजी घेतली. मात्र काही प्रकल्पात त्रुटी आढळल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अन्यथा बांधकामांना स्थगिती देण्यात येणार आहे, असेही प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र पुनर्वसनाच्या इमारती वगळता विक्री करावयाच्या इमारतींच्या बांधकामांना स्थगिती देण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.