पालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या भांडूप, कांजूर गावातील दातार वसाहतीतील भूखंडांवर शाळेची इमारत उभारणाऱ्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या (आयईएस) शाळेला पालिकेने केवळ नोटीस बजावण्याचीच कारवाई केली आहे. आठवडाभरात कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले खरे परंतु पुढे पालिकेच्या ढिम्म प्रशासाने कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे शाळाही निर्धास्त आहे!
प्रमिला पवार यांच्या तक्रारीची दखल घेत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी शाळेवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कुंटे यांनी आदेश देताच तात्काळ ‘एस’ विभाग कार्यालयाने शाळेवर नोटीस बजावली आणि सात दिवसांत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे आदेश शाळेला दिले. मात्र, आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे शाळा व्यवस्थापनाला शक्य झाले नाही. तरीही अद्याप शाळेविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही. पालिकेचा भोंगळ कारभार इथेच संपला नाही. पालिकेच्या इमारत आणि प्रस्ताव विभागाने मैदानासाठी आरक्षित भूखंडावर पाच वर्ग खोल्या बांधण्यास १९९० मध्ये परवानगी दिली. त्यावेळचे नगरसेवक बाबा कदम यांनी त्यास विरोध केला होता. परंतु पालिकेने तो विरोध डावलल्याचे माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या कागदपत्रांतून उघड झाले आहे.
दातार वसाहतीतील मुलांसाठी शाळेची निकड होती. त्यामुळे कांजूरमार्ग को-ऑप सोसायटीने आम्हाला हा भूखंड शाळेसाठी दिला. पालिकेकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन आम्ही शाळेची चार मजली इमारत बांधली. पालिकेने दिलेली भोगवटा प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक ती कागदपत्रे आमच्याकडे आहेत. शाळेच्या इमारतीवर आणखी दोन मजले बांधण्याची परवानगी घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. तसेच परवानगी मिळेपर्यंत खेळाच्या मैदानावर वर्ग खोल्या बांधण्याची परवानगी पालिकेने दिली. मात्र शाळेच्या इमारतीवर दोन मजले बांधण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर पाच आणि सहा मजले बांधून झाल्यावर मैदानातील वर्ग खोल्या पाडण्यात येतील.
– अमोल ढमढेरे, उपाध्यक्ष, इंडियन एज्युकेशन सोसायटी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा