तबेल्यांमधील गाई-म्हशींचे मलमूत्र नाल्यातच सोडण्यात येत असल्यामुळे पावसाळ्यात मुंबईत लेप्टोच्या साथीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे तबेल्याच्या मालकांवर पालिकेने नोटीस बजावून मलमूत्राची योग्य ती विल्हेवाट लावून तबेल्यांमध्ये स्वच्छता राखावी, असे आदेश देण्यात आले आहेत. पेल्पोच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तबेल्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबई मोठय़ा प्रमाणावर लेप्टोच्या साथीचा प्रादुर्भाव झाला होता. लेप्टोच्या साथीवर नियंत्रण मिळविताना पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागली होती. मोठय़ा जनावरांच्या मलमूत्रातून लेप्टोचा प्रादुर्भाव झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. यंदा पावसाळ्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमधील १७०० खासगी तबेल्यांच्या मालकांवर नोटीस बजावण्यात आली आहे. तबेल्यांतून नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येणारे गाई, म्हशींचे मलमूत्र तात्काळ बंद करावे आणि मलमूत्राची योग्य ती विल्हेवाट लावावी, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका अधिकारी लवकरच या तबेल्यांची पाहणी करणार असून नोटीसमध्ये केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे की नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. तबेल्यांमध्ये स्वच्छता केली जात नसेल तर तबेल्याच्या मालकांकडून त्यात सुधारणा करून घेतल्या जातील, असे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी बोरिवली, कांदिवली, मालाड, मालवणी आदी परिसरांमध्ये लेप्टोच्या प्रादुर्भावामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये पाच महिन्यांमध्ये लेप्टोचे २० रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या महापुरात तब्बल १२०० म्हशी मृत्युमुखी पडल्या होत्या. मुंबईतील तबेले वसई येथे हलविण्याचा निर्णय सरकारने त्या वेळीच घेतला होता. परंतु अद्यापही हे तबेले मुंबईतच आहेत.
लेप्टो रोखण्यासाठी तबेल्यांच्या मालकांना पालिकेची नोटीस
पेल्पोच्या साथीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पालिका अधिकारी तबेल्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-06-2016 at 00:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc issue notice to the stables owners to prevent leptospirosis