‘स्पार्क’च्या अकार्यक्षमतेमुळे पालिकेवर नामुष्की
‘वस्ती स्वच्छता कार्यक्रमा’अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये ३०९ शौचालये बांधण्यासाठी पालिकेने ‘स्पार्क’ या संस्थेबरोबर करार केला. मात्र निकृष्ट दर्जाचे काम आणि शौचालयांच्या देखभालीसाठी यंत्रणा उभी करण्यात ‘स्पार्क’ला आलेले अपयश यामुळे या शौचालयांची दयनीय अवस्था बनली आहे. २४१ शौचालयांची दुरुस्ती पालिकेने आपल्या विभाग कार्यालयांवर सोपविली. तर उर्वरित ९५ पैकी ९२ शौचालये तोडून त्यांची पुनर्बाधणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार नेमण्याची वेळ पालिकेवर ओढवली असून त्यासाठी पालिकेला एक ते सव्वा कोटी रुपयांची पदरमोड करावी लागणार आहे.
पालिकेने हाती घेतलेल्या वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत पालिकेने सामाजिक कार्यकर्ते जोकीम यांच्या ‘स्पार्क’ संस्थेला मुंबईमध्ये शौचालये बांधण्याचे काम दिले होते. शौचालय बांधणे आणि त्याचबरोबर वस्तीमधील रहिवाशांना शौचालय व्यवस्थापनाचे धडे देण्याची जबाबदारी ‘स्पार्क’वर सोपविण्यात आली होती. ‘स्पार्क’ने मुंबईत ठिकठिकाणी पहिल्या टप्प्यात म्हणजे १९९७ ते २००५ या काळात ४१२५ शौचकूपांचा समावेश असलेली २१४ शौचालये बांधली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनुक्रमे १३६० शौचकूप असलेली ६८ व ५४० शौचकूप असलेली २७ शौचालये ‘स्पार्क’ने उभी केली. निकृष्ट दर्जाच्या बांधकाम आणि देखभालीचा अभाव यामुळे या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.
गोवंडी येथे शौचकूप कोसळून महिलेचा झालेला मृत्यू आणि मानखुर्द येथे शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये स्फोट होऊन चार-पाच महिला जखमी झाल्यानंतर मुंबईतील धोकादायक स्थितीतील शौचालयांचा प्रश्न ऐरणीवर आला. यानंतर पालिका प्रशासनाने केलेल्या संरचना तपासणीत ‘स्पार्क’ने बांधलेली शौचालये अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळले. पहिल्या टप्प्यातील २१४ शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बाधणीची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयांवर सोपविण्यात आल्यामुळे या शौचालयांचा प्रश्न निकालात निघाला. मात्र उर्वरित ९५ शौचालये आजही धोकादायक अवस्थेत आहेत. यापैकी तीन शौचालये ‘झोपू’ योजनेत आहेत. त्यामुळे उर्वरित ९२ शौचालये पालिकेसाठी डोकेदुखी बनली आहेत.
आता ही शौचालये पाडण्यासाठी पालिकेने निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. एक शौचालय पाडून
त्याची पुनर्बाधणी करण्यासाठी पालिकेला सुमारे १ लाख २० हजार रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे. म्हणजे ९२ शौचालये पाडून त्यांची पुनर्बाधणी करायची झाल्यास पालिकेला पुन्हा सुमारे १ कोटी १० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.
‘स्पार्क’ने शौचालयांचे बांधकाम सुरू केल्यानंतर पालिकेच्या अभियंत्यांनी कामाच्या दर्जाकडे लक्षच दिले नाही. तर शौचालयांच्या देखभालीसाठी वस्ती पातळीवर मार्गदर्शन करून यंत्रणा उभी करण्यात ‘स्पार्क’ अपयशी ठरली. त्यामुळे आता पालिकेला शौचालयांचे पाडकाम आणि पुनर्बाधणीसाठी भुर्दंड सोसावा लागणार आहे.
सव्वा दोन कोटी पाण्यात
पहिल्या टप्प्यात एक शौचालय बांधण्यासाठी ५० हजार रुपये या दरानुसार पालिकेने ‘स्पार्क’ला २१४ शौचालये बांधण्यासाठी १ कोटी ७ लाख रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील शौचालय बांधणीसाठी प्रतिशौचालय १ लाख २५ हजार रुपये ‘स्पार्क’ला देण्यात आले. त्यासाठी पालिकेचे १ कोटी १८ लाख ७५ हजार रुपये खर्च झाले. म्हणजे ‘स्पार्क’ने बांधलेल्या एकूण ३०९ शौचालयांसाठी पालिकेचे २ कोटी २५ लाख ७५ हजार रुपये खर्च झाले. इतकी मोठी रक्कम खर्च करून पालिकेच्या पदरात धोकादायक शौचालये पडली.