करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीमार्फत सुरू असताना आता आयकर विभागानेही याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारले आहेत. कोविड जम्बो सेंटरमध्ये झालेले संशयास्पद गैरव्यवहार उघड करण्याकरता मुंबई, गुजरात, पुणे, प्रयागराज आणि दिल्ली येथील डझनभर ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
कोविड काळात मुंबई पालिकेने ज्या कंपन्यांसोबत करार केले होते त्या कंपन्यांना आयकर विभागाने लक्ष्य केलं आहे. या कंपन्यांच्या आर्थिक नोंदी आणि कोविडसाठी पालिकेसोबत केलेल्या करार व्यवहारांशी छाननी आयकर विभागाकडून करण्यात येत आहे.
आयकर विभागाच्या छाप्यापूर्वी ईडीने या कथित घोटाळ्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ.किशोर यांना अटक केली आहे.
ईडीच्या तपासात काय निष्पन्न झालं?
सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता, संजय शाह, राजीव साळुंखे, डॉ. किशोर बिसुरे, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनी व डॉ. अरविंद सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएससीआय वरळी व दहिसर येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेन्ट सर्विस कंपनीला मिळाले होते. त्याबाबत कंपनीकडून महापालिकेला सादर केलेला हजेरीपट व कागदपत्रे बनावट असल्याचे ईडीला तपासात निदर्शनास आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना केंद्रांवर कमी वैद्यकीय कर्मचारी कार्यरत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या फुगवण्यात आली. हा सर्व प्रकार सुजीत पाटकर यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले.