स्वतःच्याच सुरक्षेच्या काळजीत असलेल्या मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि अधिकाऱयांना मंत्रालयाच्या धर्तीवर सुरक्षा पुरविण्याचा विचार केला जाऊ लागला आहे. मुंबई महापालिकेची सुरक्षा अधिक बळकट कशी करता येईल, याचा आढावा सध्या घेण्यात येत असून, त्यामध्ये मंत्रालयाइतकीच तगडी सुरक्षा मुंबई महापालिकेला देण्याचा विचार केला जात आहे.
गेल्या आठवड्यात जकातदलालांनी आपल्याला धमकावल्याची तक्रार महापालिकेतील विधी समितीचे अध्यक्ष मकरंद नार्वेकर यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचा विचार सुरू झाला. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाचे पडसाद उमटले. पालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात येत असून, ती अधिक मजबूत करण्याची गरज आहे का, याचीही चाचपणी करण्यात येते आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले.
जकात नाक्यांवर घातलेल्या छाप्यांनंतर काही दलालांनी सोमवारी महापालिकेत येऊन मला धमकावल्याची तक्रार नार्वेकर यांनी केली होती. एक मे रोजी नार्वेकर यांनी वाशी आणि मुंबई सेंट्रलमधील जकात नाक्यावर छापा टाकून जकातचोरी पकडली होती. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आले होते.