देवनार गावामधील रस्त्यासाठी आरक्षित असलेला १७५० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेच्या अट्टाहासामुळे पालिकेच्या हातून निसटला. खरेदी सूचनेची मुदत उलटून गेल्यामुळे आता या भूखंडावरील आरक्षणही रद्द झाले असून या भूखंडावर  हवा तसा विकास करण्यास जमीन मालकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवनार गावात विकास नियोजन रस्त्यासाठी १७५० चौरस मीटर क्षेत्रफळाचे भूखंड आरक्षित होते. विकास नियोजन रस्त्यासाठी पालिकेने हा भूखंड खरेदी करावा अशा आशयाची खरेदी सूचना जमीन मालक ललितचंद्र झुठाणी यांनी ८ मे २०१२ रोजी पालिकेला केली होती.
७ मे २०१३ रोजी या खरेदी सूचनेची मुदत संपुष्टात येत होती. तत्पूर्वी हा भूखंड खरेदी करणे क्रमप्राप्त होते. सुधार समितीच्या २८ सप्टेंबर २०१२ रोजी पार पडलेल्या बैठकीत हा भूखंड खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. या बैठकीत या प्रस्तावावर केवळ चर्चा झाली. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगर-सेविकेच्या आग्रहाखातर हा प्रस्ताव सुधार समिती अध्यक्ष राम बारोट यांनी दफ्तरी दाखल केला.
हा प्रस्ताव दफ्तरी दाखल व्हावा यासाठी शिवसेना सदस्य आग्रही होते, तर भूखंड खरेदी करावा, असे भाजप सदस्यांचे म्हणणे होते. सुधार समिती सदस्यांनी या भूखंडाची पाहणीही केली. परंतु शिवसेना-भाजप सदस्यांच्या वादातच मुदत संपली. आता या भूखंडावरील विकास नियोजन रस्त्याचे आरक्षण रद्द झाले असून जमीन मालक त्यावर विकास करण्यास मोकळा झाला आहे.