बकाल झोपडपट्टी, आठ बाय दहाची झोपडी, मिणमिणता दिव्याचा अंधूक प्रकाश, घरात आठ-दहा माणसे, आजूबाजूला मद्यपि, गर्दुल्ल्यांचा गोंगाट, झोपडीसमोरच वाहणारी गटारगंगा, दरुगधी, अधूनमधून उद्भवणारे आजाराच्या साथींचे थैमान, अभ्यासाची पुस्तके घेण्याची पालकांची नसलेली ऐपत अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अशक्य बनते. ही बाब ओळखून आता पालिकेने गोवंडी परिसरात अभ्यासिका आणि पाठय़पुस्तकांचे पुस्तकालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासिक आणि पुस्तकालयाची मुहूर्तमेढ लवकरच रोवण्यात येणार असून ऑक्टोबपर्यंत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना अगदी नाममात्र शुल्कामध्ये घेता येणार आहे. अभ्यासिका आणि पुस्तकालयाची जबाबदारी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स उचलणार असून त्यांच्या मदतीने पालिकेने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वसा घेतला आहे.
गोवंडी, मानखुर्द परिसरातील शिवाजीनगर, बैंगनवाडी, टाटानगर, गौतमनगर आदी परिसर झोपडपट्टीने व्यापला आहे. कितीही स्वच्छता केली तरी येथे कचऱ्याचे साम्राज्य कायम असते. परिणामी दरुगधी आणि अधूनमधून आरोग्याचे प्रश्न येथे निर्माण होत असतात. मद्यपि, गर्दुल्ले, समाजकंटकांचा कायम या वस्त्यांमध्ये वावर सुरू असते. घरात अभ्यासासाठी पोषक वातावरणच नसते. त्यामुळे अभ्यास करण्याची इच्छा असूनही विद्यार्थी मागे पडतात. काही विद्यार्थी समाजकंटकांच्या नादाने भरकटतात आणि आयुष्याचे मातेरे करून घेतात.
झोपडपट्टीतील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे आणि बकाल वस्तीच्या बाहेर पडावे यासाठी पालिकेने आता गोवंडीमधील देवनार म्युनिसिपल कॉलनीमध्ये अभ्यासिका आणि पाठय़पुस्तकंचे पुस्तकालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपापल्या विभागात एक लोकोपयोगी उत्तम असा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश तत्कालीन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांपुढे मांडला होता. त्यानुसार उपायुक्त अशोक खैरे यांनी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि पाठय़पुस्तक पुस्तकालय उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची तयारी एम-पूर्व विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. देवनार म्युनिसिपल कॉलनीमधील सुमारे २५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक भूखंड रिकामा आहे. त्यावरील एक हजार चौरस मीटर जागेत अभ्यासिका आणि पुस्तकालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामास स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली असून कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आले आहेत. येत्या सप्टेंबरअखेरीस इमारत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या अभ्यासिका आणि पुस्तकालयाचा वापर शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना करता येणार आहे. झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत शांत वातावरणात अभ्यास करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेण्यात येणार आहे. महाविद्यालयांतील वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वेळा अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध होत नाहीत. तर पालकांकडे पैसे नसल्यामुळे पुस्तके विकत घेता येत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना पुस्तकालयाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येणार आहे. सर्व अभ्यासक्रमांची पुस्तके या पुस्तकालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत. अनेक वेळा विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची माहिती नसते. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. मात्र आता या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांची माहितीही देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांची दालने खुली होतील, असा विश्वास किरण दिघावकर यांनी व्यक्त केला. पाठय़पुस्तकालयात कोणती पुस्तके उपलब्ध करायची, पुस्तकालय व अभ्यासिकेची देखभाल कशा पद्धतीने करायची, तेथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करायच्या आदींबाबत लवकरच टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सबरोबर पालिका अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास कसा घडवता येईल, याबाबत या बैठकीत र्सवकष विचार केला जाणार आहे. पालिकेच्या या प्रकल्पामुळे झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा