एकीकडे मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असताना त्याच्या उच्चाटनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडू लागल्या आहेत. मात्र, तरीही या अपुऱ्या, तोकडय़ा उपाययोजनांबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे! डास निर्मूलनाबाबत आदेश देण्याऐवजी ताप व अन्य लक्षणे जाणवू लागताच नागरिकांनी डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे हात तोकडे पडले आहेत. पालिकेच्या अपयशामुळे सध्या अनेक भागांमध्ये डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांनी डेंग्यू निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौरांना दिली. ही माहिती ऐकून महापौरांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा, केईएम रुग्णालयातील अधिष्ठात्री डॉ. शुभांगी पारकर कीटकनाशक अधिकारी डॉ. राजेंद्र नारिग्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करावे, तसेच पूर्वीप्रमाणे विविध विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. आपल्या भागात धूम्रफवारणीची आवश्यकता असल्यास त्याची पालिकेला तात्काळ सूचना करावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
उपाय तोकडे, तरीही महापौर समाधानी
एकीकडे मुंबईत डेंग्यूने थैमान घातले असताना त्याच्या उच्चाटनासाठी प्रशासनाच्या उपाययोजना तोकडय़ा पडू लागल्या आहेत. मात्र, तरीही या अपुऱ्या, तोकडय़ा उपाययोजनांबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे!

First published on: 30-10-2014 at 04:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc mayor happy with work out on dengue