साथीच्या आजारांविरोधातील कार्यक्रमाप्रमाणेच आता महानगरपालिकेने खड्डय़ांमुळे होत असलेल्या दुखण्यांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ताप, सर्दी याप्रमाणेच फ्रॅक्चर, कंबरदुखी, मानदुखी यासाठी अस्थितज्ज्ञांकडे रांगा लागल्या आहेत. एवढेच नव्हे तर खड्डय़ांमुळे प्रवासाच्या वेळेत दुपटीने वाढ झाल्याने आधीच गंभीर असलेल्या महिलांच्या योनीमार्ग संसर्गाचा प्रश्नही दुर्लक्षिण्यासारखा नाही.
सांताक्रूझ येथे राहणारे मंदार लोटलीकर गेल्या महिन्यात खड्डय़ामुळे पडले. ‘रात्रीच्या सुमारास वाकोला येथील एक खड्डा चुकवताना माझी गाडी घसरली आणि भावासह मी बाइकवरून पडलो. दोघांनाही मुका मार बसला. सुरुवातीला हातावर उपचार केले, पण आता मी कंबरदुखीने त्रस्त झालो आहे,’ असे त्यांनी सांगितले. खड्डय़ांमुळे जीव गमावावा लागलेल्या नागरिकांची जबाबदारी झटकण्याची चढाओढ लागली असताना लोटलीकर यांच्यासारख्या हजारो मुंबईकरांच्या आजारांचे दायित्व पालिकेने घेण्याची शक्यताच नाही! मात्र भ्रष्टाचार करण्यात गुंतलेले पालिका अधिकारी खड्डय़ांची जबाबदारीही घेत नाहीत, तेथे नागरिकांचे आरोग्य दूर राहिले.  
ताप, डायरिया, कावीळ यांसाठी जनरल प्रॅक्टिशनरकडे लागत असलेल्या रांगांप्रमाणेच ऑर्थोपेडिककडेही रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात झालेल्या खड्डय़ांमुळे पडणारे, पाय मुरगळणारे, अपघातामुळे हात-पाय फ्रॅक्चर झालेल्यांची संख्या या वेळी २० टक्क्यांनी वाढली आहे. त्यातच सुरुवातीला हाडांवर उपचार झाल्यावर काही दिवसांनी हेच पेशंट कंबरदुखी, मानदुखीसारख्या आजारांनी हैराण होतात. मणक्याचे हाड सरकणे, माकडहाड दुखणे यांसारखे आजार तर आयुष्यभर पाठ सोडत नाही, असे अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. राम प्रभू यांनी सांगितले.
खड्डय़ांमुळे बाइकस्वारांचाच नाही तर बस, टॅक्सी, रिक्षामधील प्रवाशांचा जीवही मेटाकुटीला येत आहे. वर्षांनुवष्रे दिवसाचे दहा ते बारा तास खड्डय़ांमध्ये घालवत असलेल्या रिक्षाचालकांची दुखणी तर अमर्याद आहेत. ‘रिक्षाचा पुढचा टायर लहान असल्याने काही इंचाच्या या खड्डय़ांमुळेही रिक्षा अडकून बसते. दिवसभर रिक्षा चालवल्यावर रात्री पाठीची हाडे खिळखिळी होतात,’ असे मुलुंडचे रिक्षाचालक प्रमोद राऊत म्हणाले.
खड्डय़ांमुळे केवळ गाडीचालकच नाही तर पादचारीही हैराण झाले आहेत. खड्डय़ांमुळे साचलेले पाणी वाहने अंगावर उडवून जातात. ‘रस्त्यावर पडणाऱ्या पानाच्या पिचकाऱ्या, थुंकी, लघवी, रस्त्याकडेला बसणाऱ्या मुलांचे शौच.. असे काहीही त्या पाण्यात मिसळलेले असू शकते. एकीकडे पालिकेनेच साठलेल्या दूषित पाण्याबद्दल जनजागृती मोहीम चालवली असताना पालिकेच्या नाकर्तेपणामुळे त्वचेचे रोग, साथीचे आजारही होतात,’ असा आरोप अंधेरी येथे राहणाऱ्या आदिती गाडगे यांनी केला. सर्वच रस्ते खड्डय़ांत गेल्याने घरी पोहोचण्याच्या वेळेतही दुप्पट वाढ झाली आहे. महिलांच्या स्वच्छतागृहांबाबतही परवड आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ६० टक्के महिलांना योनीमार्गाचा संसर्ग होत असल्याचे धक्कादायक वास्तव ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाउंडेशनच्या पाहणीत समोर आले.
‘दररोजच्या त्रासामुळे किडनीवर सतत दाब येऊन मूत्रिपडविकार तर होतातच पण स्वच्छतागृहांची सोय नसल्याने महिला पाणी पिण्याचेही टाळतात, त्याचा आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होतो,’ असे केईएम हॉस्पिटलच्या सामाजिक वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. कामाक्षी भाटे म्हणाल्या. रस्त्यामुळे लागणाऱ्या प्रवासाच्या वाढीव वेळांमुळे हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा