नव्या वसाहतीतही मूलभूत सुविधांची वानवा
समीर कर्णुक, मुंबई</strong>
प्रदूषण, असुविधांमुळे कुप्रसिद्ध ठरलेल्या चेंबूरच्या माहुलच्या धर्तीवर या परिसराला लागूनच गडकरी खाण आणि विष्णू नगर येथे प्रकल्पग्रस्तांकरिता दुसरे माहुल उभे राहत आहे. घाणीचे साम्राज्य, प्रदूषण, अपुऱ्या सोयीसुविधा अशा अनेक समस्या माहुल गाव येथे पुनर्वसन केलेल्या प्रकल्पग्रस्तांना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहण्यास प्रकल्पग्रस्तांचा विरोध असतो. या संदर्भातील याचिका विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. आता माहुलची प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे पालिका नव्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलला लागूनच असलेल्या गडकरी खाण आणि विष्णू नगर येथे पुनर्वसन करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वसाहतींची अवस्थाही माहुलप्रमाणेच आहे.
माहुलप्रमाणे इथेही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
चेंबूरच्या गडकरी खाण आणि विष्णू नगर परिसरात माहुलप्रमाणेच एमएमआरडीएने २००५ मध्ये ५० इमारती बांधल्या. या इमारतींमध्ये सध्या आठ हजार घरे असून गेली १४ वर्षे ती रिकामी पडून आहेत. २०१२ मध्ये एमएमआरडीएने ही घरे मुंबई महानगरपालिकेच्या स्वाधीन केली. मात्र या पालिकेने या इमारतींकडे कधीच लक्ष न दिल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शिवाय इतर सोयीसुविधांचा अभाव आहेच. आता माहुलची क्षमता संपल्याने नव्या प्रकल्पग्रस्ताचे या ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने पालिकेने इमारतींच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. अर्थात या नव्या वसाहतींच्या आसपासही अनेक तेल, गॅस आणि वीज कंपन्या असल्याने मोठय़ा प्रमाणात प्रदूषणाचा त्रास आहे. परिणामी येथील रहिवाशांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. या परिसरात पाण्याची, रुग्णालयाची, शाळेची आणि बसचीही सुविधा नाही. त्यामुळे नव्या जागेत पालिका योग्य सुविधा उपलब्ध करून देणार तोपर्यंत येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास विरोध राहील, असे शिवसेना उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सांगितले. जवळच राहणाऱ्या स्थानिक प्रवाशांना वेगळीच भीती आहे. ‘आम्ही या परिसरापासून जवळच राहतो. आम्हाला तीन दिवसांतून एकदाच पाणी मिळते. या इमारतीमध्ये आठ हजार लोक राहायला आले तर आम्हाला पाणीच मिळणार नाही,’ अशी शंका तृप्ती देशमुख या स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.
गैरसोयींचे गाव
गडकरी खाण परिसरातील डोंगराच्या बाजूला निर्जन ठिकाणी या इमारती बांधण्यात आल्या आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात. या वसाहतींच्या आसपासच्या परिसरात एकही शाळा नाही की रुग्णालय. इतकेच तर किराणा दुकानही नाही. शिवाय इमारतींची देखभाल होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. घरांच्या सर्व खिडक्या, दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच दोन इमारतींमधील अंतर अगदीच कमी असल्याने आगीसारखी एखादी घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडीदेखील पोहचू शकणार नाही.