मुंबई फलकमुक्त झाल्याची बतावणी न्यायालयात करणाऱ्या पालिकेने ‘मेक इन इंडिया’साठी फलकबाजी करण्याची तयारी सुरू केली आहे. ‘मेक इन इंडियाचा’ संदेश सर्व मुंबईकरांपर्यंत पोहोचावा यासाठी लहान-मोठे बॅनर्स प्रत्येक विभाग कार्यालयांच्या हद्दीत झळकविण्यात येणार आहेत. राजकीय नेते, मंडळे, संस्था, कंपन्या, धार्मिक संस्थांवर फलकबंदी घालून पालिकाच आता बॅनरबाजी करू लागल्यामुळे मुंबईकर हैराण होऊ लागले आहेत.

‘स्वच्छ भारत अभियाना’ची पाहणी करण्यासाठी नवी दिल्लीतून एक पथक मुंबईत दाखल होणार हे समजताच अतिरिक्त आयुक्तांनी संपूर्ण मुंबईत प्रबोधनपर बॅनर्स झळकविण्याचे फर्मान पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना सोडले होते. अतिरिक्त आयुक्तांची आज्ञा शिरसावंद्य मानून साहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीत स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे लहान-मोठे बॅनर्स झळकविले होते. न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश दिले असताना पालिकेनेच प्रबोधनाच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर बॅनर झळकविल्याने मुंबई विद्रूप होऊ लागली होती. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या निमित्ताने झळकवलेले बॅनर्स काढून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले. आता विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना हे बॅनर उतरविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांकडून देण्यात आले आहे.

येत्या १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीएच्या मैदानावर ‘मेक इन इंडिया’निमित्त मोठय़ा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देश-विदेशातील प्रतिनिधी सहभागी होणार असून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढावी या दृष्टीने या कार्यक्रमात प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, योजनांची माहिती सादर करण्याची संधी या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. ‘मेक इन इंडिया’च्या जाहिरातबाजीसाठी पालिकेने पुन्हा एकदा मुंबईत बॅनर्स झळकविण्याचा निर्णय घेतला आहे. हे बॅनर्स पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या ताब्यात देण्यात येणार असून ते मोक्याच्या ठिकाणी झळकविण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहेत. त्याशिवाय मोक्याच्या ठिकाणी काही मोठय़ा आकाराचे फलकही लावण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे हे बॅनर बनविण्याची धावपळ अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. लवकरच मुंबईमध्ये ‘मेक इन इंडिया’चे बॅनर झळकू लागतील आणि त्यामुळे मुंबईच्या विद्रूपीकरणात भर पडेल. या बॅनरबाजीमुळे पालिकाही आता राजकीय नेत्यांच्या पावलावर पावले टाकू लागल्याची टीका मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader