मुंबईतील कचराभूमीचा वापर सुरूच राहणार; प्रदुषणापासून सुटका नाहीच
देवनारसह अन्य कचराभूमीवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास अजून दीड-दोन वर्षे कालावधी लागणार असून या कचराभूमी बंद केल्या जाणार नाहीत आणि तळोजा येथेही कचरा टाकला जाणार नाही, असे महापालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे मुंबईकरांना कचऱ्याचा त्रास, प्रदूषण याला तोंड देण्याशिवाय कोणताही पर्याय नसून शिवसेनेला आगामी निवडणुकीत कचऱ्याची धग सहन करावी लागण्याची चिन्हे आहेत.
देवनार कचराभूमीत लागणाऱ्या आगीमुळे शिवसेना व महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. देवनारसह अन्य ठिकाणी कचराभूमीचा वापर थांबवून अन्यत्र व्यवस्था करण्याच्या घोषणा शिवसेना नेत्यांकडून केल्या जात आहेत. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसून देवनार व अन्य कचराभूमीचा वापर सुरूच राहील. देवनार येथे कुंपणाचे काम सुरू असून माती पसरली जात आहे. गॅस बाहेर निघण्यासाठी पाइप टाकले जात आहेत, असे संबंधितांनी सांगितले. कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी सल्लागारांचा अहवाल अजून आलेला नाही. त्यासाठी किमान दोन-तीन आठवडे लागतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया होईल. त्यासाठीही किमान तीन-चार महिने कालावधी लागणार आहे. त्यामुळे निविदा मंजूर करून काम देण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर उजाडण्याची चिन्हे आहेत.

प्रश्न सुटण्याची शक्यता धूसर..
तळोजा येथे राज्य सरकारने कचराभूमीसाठी जागा दिली असली तरी तीन-चार महिने तरी तेथे वापर सुरू करता येणार नाही. तेथे कचरा टाकला, तर स्थानिकांचा विरोध होईल. त्यामुळे तेथेही त्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावावी लागेल. पर्यायी जागेचा वापरही सुरू होणार नसल्याने मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे देवनार, मुलुंडमधील नागरिकांना प्रदूषणाला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही. आगामी पालिका निवडणुकीत त्याचे खापर सेनेवर फोडण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने सुरुवातही केली आहे.

Story img Loader