निवृत्ती वेतन तीन वर्षांनी , पण तेही अर्धवट
शीव येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात तब्बल ३१ वर्षे अधिपरिचारिका म्हणून रुग्णसेवा करणाऱ्या महिलेने आजारपणामुळे स्वेच्छानिवृत्ती घेतली. पण सेवा निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी तब्बल तीन वर्षे झगडावे लागले. तिने एकटीने दिलेल्या लढय़ाअंती या महिन्यात प्रथमच तिला निवृत्तिवेतन मिळाले, पण तेही अर्धवटच. त्यामुळे पूर्ण निवृत्तिवेतन आणि ग्रॅच्युइटीची रक्कम मिळविण्यासाठी तिची एकटीची लढाई सुरूच आहे.
लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये जयंती हिवाळे या अधिपरिचारिका पदावर कार्यरत होत्या. १ मे २०१३ रोजी त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाली. घरी जयंती आणि त्यांची आजारी आई अशा दोघीच. स्वेच्छानिवृत्तीनंतर निवृत्तिवेतन मिळेल आणि त्यात आपल्या आणि आईच्या आजारपणाचा खर्च भागविता येईल, असा जयंती यांनी विचार केला होता. मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेली तीन वर्षे त्यांना निवृत्तिवेतन मिळू शकले नाही. जयंती यांची फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर प्रवास करीत होती. रुग्णालय आणि आरोग्य खात्यातील लेखनिकांच्या दप्तरदिरंगाईमुळे या विलंबात भर पडत होती. जयंती वारंवार निवृत्तिवेतन आणि ग्रॅच्युइटीबाबत रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होत्या, परंतु तुमच्या खूप रजा झाल्या आहेत, असे कारण त्यांना पुढे करण्यात येत होते. परंतु आपण वेळोवेळी रजेचा अर्ज सादर करून ती रीतसर घेतली होती, असे जयंती यांचे म्हणणे आहे. डोंबिवली येथे राहणाऱ्या जयंती यांना दम्याचा त्रास असतानाही निवृत्तिवेतनासाठी लोकमान्य टिळक रुग्णालय आणि भायखळा येथील कार्यालयात खेटे घालावे लागत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच ढासळली.
वडिलांचे निधन झाल्यानंतर आईला कुटुंब निवृत्तिवेतन मिळत होते. त्यामध्ये आई आणि जयंती यांच्या आजारपणाचा खर्च जेमतेम चालत होता. परंतु जून २०१५ मध्ये आईचे निधन झाले आणि कुटुंब निवृत्तिवेतनाचा आधारही तुटला. आता त्यांना उत्पन्नाचे साधनच नसल्याने त्यांच्या उपचारासाठीही पैसे हाती नाहीत. त्यामुळे त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या आहेत. परंतु पालिका प्रशासनाला त्याची खंत नाही.
अनेक वेळा खेटे घातल्यानंतर आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मार्च २०१६ मध्ये त्यांना पहिल्यांदा निवृत्तिवेतन देण्यात आले. निवृत्तिवेतन मिळताच त्यांचा जीव भांडय़ात पडला. पण निवृत्तिवेतनाची अपूर्ण रक्कम पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. आता पूर्ण निवृत्तिवेतन आणि ग्रॅच्युइटीची रक्कम मिळविण्यासाठी आणखी किती काळ लढाई द्यावी लागणार असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा