मुंबई : वांद्रे पूर्व येथील ४० वर्षांपासूनची ठाकरे गटाची शिवसेना शाखा २२ जून रोजी मुंबई महानगरपालिकेने जमीनदोस्त केली. ही शाखा अनधिकृत असल्यामुळे शाखेवर कारवाई करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला. कार्यकर्त्यांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यालाही मारहाण केली. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.
पालिकेने ठाकरे गटाच्या शाखेवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात पालिकेच्या एच-पूर्व विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शिष्टमंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाखेचे पाडकाम केलेल्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. शाखा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करताना शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेबांची प्रतिमा बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली. मात्र, कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्याने शाखेवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.