मुंबई : विधानसभेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्यामुळे पालिका स्तरावरील बहुतांशी कामांचा शुभारंभ करण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकांचे सत्र वाढले आहे. या बैठकांसाठी पालिका आयुक्तांसह पालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावले जाते. एकेका विषयासाठी तीन चार तास अधिकारी बैठकांमध्येच व्यस्त होऊ लागले आहेत.

हेही वाचा >>> बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना

विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर केव्हाही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्ष कामाला लागला आहे. नगरसेवकांची मुदत संपलेली असल्यामुळे पालिका स्तरावरील प्रश्न घेऊन आमदार मुख्यालयात, पालिकेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह येऊ लागले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मंत्र्याच्या बैठकाही होऊ लागल्या आहेत. भेटायला येणारे आमदार आणि मंत्र्यांच्या आढावा बैठकांमध्ये पालिकेचे अधिकाऱ्यांना तासनतास बसावे लागते आहे. सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना तासनतास बसवून ठेवल्यामुळे पालिकेचे कामकाजही ठप्प झालेले असते. राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे महायुतीचे सरकार असून या दोन पक्षाच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या बैठकांच्या स्पर्धांमध्ये पालिकेचे अधिकारी ताटकळत असतात.

हेही वाचा >>> २५ हजार आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ४० लाख लोकांची तपासणी

पालकमंत्र्यांच्या बैठकांचे संत्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पालिकेत वाढले आहे. शहर विभागाचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या आठवड्यात सर्व अधिकाऱ्यांना बोलावून आढावा बैठक घेतली. या बैठकीत केसरकर यांनी सुमारे ६२ विषयांचा आढावा घेतला. मात्र बरेचसे विषय पुढे न सरकल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर या आठवड्यातही केसरकर यांनी पुन्हा एकदा बैठक घेतली. तसेच त्यांनी यापुढे सर्व बैठकांना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनाही बोलवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सोमवारच्या बैठकीत आयुक्तदेखील हजर होते. शहर विभागातील सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. चार तास ही बैठक चालली. दोन दोन मिनिटांच्या विषयासाठी अधिकारी तासनतास ताटकळत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येही नाराजीचे वातावरण होते. उत्तर मुंबईतील खासदार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवलीतील आर मध्य विभाग कार्यालयात बुधवारी एका आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला पालिका, म्हाडा, वनखाते अशा सर्वच प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीसाठी पालिका आयुक्त आणि पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त, तसेच चार उपायुक्त, विभागीय उपायुक्त यांनाही बोलावण्यात आले होते. बोरिवलीत ही बैठक असल्यामुळे सगळे अधिकारी दिवसभर बोरिवलीत होते. त्यामुळे पालिका मुख्यालयात अक्षरशः शुकशुकाट होता. बैठकीचा वेळ आणि प्रवासाचा वेळ यामुळे हा संपूर्ण दिवस पालिकेचे कामकाज जवळजवळ ठप्प होते.