मुंबईतील कचरा नियमितपणे उचलण्यात येतो की नाही, कचराकुंडीतून कचरा घेऊन जाणारी गाडी डम्पिंग ग्राऊंडवर किती वाजता पोहोचली, वाटेत कुठे थांबली का आदींवर आता पालिकेची करडी नजर राहणार आहे. कचरावाहू गाडय़ा आणि कचरा कुंडय़ांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याने मुंबई बकाल करणाऱ्या कचऱ्यावर नजर ठेवणे पालिकेला शक्य होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कचरावाहू गाडय़ांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र येत्या पाच महिन्यात संपूर्ण मुंबईतील कचरावाहू गाडय़ांवर ही यंत्रणा बसवून कचऱ्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
कचरा वाहून नेणारी गाडी वेळेवर येत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग रस्त्यातच पडून राहिल्याचे दृष्टीस पडतात. त्यामुळे आसपासच्या परिसरात दरुगधी आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर भटकी कुत्री आणि घुशींचाही उपद्रव होत असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार पालिकेच्या विभाग कार्यालयांकडे करीत असतात. मात्र कंत्राटदाराच्या कचरावाहू गाडय़ांवर अधिकाऱ्यांचाही अंकूश नसल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळणे अवघड बनले होते. त्यामुळे कचरावाहू गाडय़ांवर जीपीएस यंत्रणा बसविण्याचा तोडगा पालिकेने काढला आहे. जीपीएस यंत्रणेमुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून कचरावाहू गाडय़ांवर नजर ठेवणे शक्य होणार आहे, असे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीत म्हणजे प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातील कचरा उचलणाऱ्या गाडय़ांवर प्रायोगिक तत्वावर व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे कचरा उचलणारी गाडी वेळेवर येते का, कचरा उचलल्यानंतर गाडी कुठे गेली, डम्पिंग ग्राऊंडवर किती वाजता पोहोचली अशी सर्व माहिती अधिकाऱ्यांना कार्यालयातच उपलब्ध होणार आहे. उचललेला कचरा घेऊन डम्पिंग ग्राऊंडवर जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या गाडय़ा त्याच मार्गाने जातात की मध्येच अन्य ठिकाणी थांबताच याची माहितीही या यंत्रणेमुळे समजणार आहे.
जी-दक्षिण विभागातील कचराकुंडय़ा आणि कचरावाहू गाडय़ा, डम्पिंग ग्राऊंड येथे आयएफआयडी रिडर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे कचरावाहू गाडय़ांवर लक्ष ठेवता येईल, अशी माहिती देऊन अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास म्हणाले की, मुंबई स्मार्ट सिटी बनविण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर इंटरनेटचा वापर करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्जन्य जलवाहिन्यांवरही जीपीएस ट्रॅकर्स यंत्रणा बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यासाठी आवश्यक असलेले नियंत्रण कक्षाच्या उभारणीचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने मुंबई शहर स्मार्ट सिटी बनेल.

Story img Loader