मुंबई: मालाड येथील मढ, मार्वे येथे मोठय़ा प्रमाणात अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या स्टुडिओंबाबत पालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ४९ अनधिकृत स्टुडिओंबाबत तक्रारी करण्यात आल्यात आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्टुडिओ विरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पालिका उपायुक्त हर्षद काळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना चार आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
याप्रकरणामध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाबाबत तपासणी करण्यात येणार आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. २०२१ पासून ते २०२२ या कालावधीत विविध यंत्रणांच्या माध्यमातून ४९ स्टुडिओच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामध्ये एनडीझेड आणि सीआरझेड परिसरातील स्टुडिओच्या तक्रारीचा समावेश होता. बोगस कागदपत्रांच्या आधारे तसेच पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे स्टुडिओ बांधण्याचे आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे उपायुक्त हर्षद काळे यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.